नवी दिल्ली : देशभरातील शहरांमध्ये वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामांच्या प्रकारांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Supreme court criticizes unauthorized constructions across the country) बांधकाम नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना महापालिका आणि नगरपालिका अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. काही व्यक्तींना मंजूर बांधकाम आराखड्याच्या मर्यादेबाहेर जाऊन बांधकाम करण्याची मुभा दिली जाते, तर सामान्य नागरिकांना मात्र नियमांचे पालन करण्यास भाग पाडले जाते. हा दुजाभाव का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या खंडपीठाने देशभरात बांधकाम नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. “देशभरात बांधकाम नियमांचे सर्रास आणि उघडपणे उल्लंघन होत असल्याचे पाहून आम्ही अस्वस्थ आहोत,” असे खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले.
नियम सर्वांसाठी समान का नाहीत?
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडक भूमिका घेतली जात असल्याबद्दल न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. काही नागरिकांना नियमांचे उल्लंघन करूनही मोकळीक मिळते, तर इतरांना कायद्याचे पालन करावे लागते, हा कोणता न्याय, असा सवाल खंडपीठाने केला.
“काही नागरिक नियमांचे उल्लंघन करूनही सुटतात, तर इतरांना कायद्याचे पालन करण्यास भाग पाडले जाते. मग कायद्याचे बंधन सर्वांवर समान का असू नये?” असे न्यायालयाने सुनावले.
महापालिका काही विशिष्ट व्यक्तींना बांधकाम नियमांचे उल्लंघन करून मंजूर आराखड्यापेक्षा अधिक बांधकाम करण्याची परवानगी कशी देतात, यावरही खंडपीठाने तीव्र आक्षेप घेतला. अशा प्रकारांमध्ये संबंधित नागरिक आणि महापालिका अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे स्पष्टपणे नमूद करत, “आम्ही शब्द जपून वापरत नाही. प्रत्यक्षात काय घडत आहे, याची आम्हाला जाणीव आहे,” असे न्यायालयाने सुनावले.
कायद्याचे राज्य केवळ कागदावर राहण्याची भीती
बांधकाम नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणाच कारवाई करण्यात अपयशी ठरत असतील, तर कायद्याच्या राज्याचे महत्त्वच संपुष्टात येते, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
शहरांमधील महापालिकांच्या बांधकाम तपासणी व्यवस्थेची अवस्थाही अत्यंत दयनीय असल्याचे न्यायालयाने नमूद केले. अनेकदा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर किंवा मोठ्या प्रमाणात उभे राहिल्यानंतरच तपासणी केली जाते. तोपर्यंत नियमभंग झालेला असतो आणि त्यावर प्रभावी कारवाई करणे कठीण बनते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
दरम्यान, देशभरातील अनधिकृत बांधकामांवर संबंधित यंत्रणांनी केलेल्या प्रत्येक कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने स्वतः लक्ष ठेवणे व्यवहार्य किंवा शक्य नसल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनीच आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडून बांधकाम नियमांची निष्पक्षपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचा न्यायालयाच्या निरीक्षणाचा सूर होता.


