कोरगाव : सह्याद्रीच्या घनदाट जंगलात पट्टेरी वाघांचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथे रात्रीच्या सुमारास स्थानिक युवकांना वाघाच्या बछड्याचे दर्शन झाले. या बछड्याचा वावर युवकांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. या दृश्यामुळे परिसरात वन्यजीव प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा बछडा स्थानिक युवकांच्या नजरेस पडला. काही पर्यटकांनाही दोन ते तीन दिवसांपूर्वी या बछड्याचे दर्शन झाले होते. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, या बछड्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे आहे.
दरम्यान, आंबोली-मांगेली या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये यापूर्वी करण्यात आलेल्या वन्यजीव सर्वेक्षणात तब्बल १० ते ११ पट्टेरी वाघांचे अस्तित्व आढळून आले होते. त्यानंतर आता चौकुळ परिसरात वाघाच्या बछड्याचे दर्शन झाल्याने या जंगलपट्ट्यात वाघांचा वावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
बछड्याच्या दर्शनामुळे या भागात वाघांचे वास्तव्य, त्यांच्या अधिवासाची व्याप्ती आणि संभाव्य प्रजनन याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सह्याद्रीच्या जंगलातील जैवविविधतेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


