भोपाळ : मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याच्या मालमत्तांवर लोकायुक्तांनी छापे टाकून तब्बल ७.६ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती उघडकीस आणली आहे. (Madhya Pradesh's Lokayukta has searched three addresses linked to a tiger reserve official and put the first estimate of his assets at about Rs 7.6 crore.). या कारवाईत २.५ किलो सोने, १.६ किलो चांदी आणि २६.३६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल ५६० टक्के अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.
सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक संचालक संजीव कुमार शर्मा यांच्या मालमत्तांवर शनिवारी लोकायुक्तांच्या भोपाळ विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. नर्मदापुरम जिल्ह्यातील त्यांचे शासकीय निवासस्थान आणि कार्यालय, तसेच छिंदवाडा जिल्ह्यातील खासगी निवासस्थान अशा तीन ठिकाणी एकाच वेळी झडती घेण्यात आली.
या छाप्यात २.५ किलो सोने मिळाले असून त्याची अंदाजे किंमत ३.५ कोटी रुपये आहे. तसेच १.६ किलो चांदी, २६.३६ लाख रुपयांची रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. तपासादरम्यान शर्मा यांच्याशी संबंधित दोन आलिशान आतिथ्य व्यवसायही समोर आले आहेत. यामध्ये सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे ‘इकोटेल रिसॉर्ट’ आणि एक कोटी रुपये अंदाजित मूल्य असलेल्या ‘सेरेनिटी द व्हिला’चा समावेश आहे.
याशिवाय २८ जमीन व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे तपास पथकाच्या हाती लागली आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ, महिंद्रा केयूव्ही, रॉयल एनफिल्ड बुलेट आणि स्कूटर अशा वाहनांची एकत्रित किंमत सुमारे ३१.२ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. घरातील वस्तू आणि इतर कौटुंबिक मालमत्तेचे मूल्यही सुमारे ५० लाख रुपये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
तपासाच्या सुरुवातीला शर्मा यांनी ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा २२८ टक्के अधिक मालमत्ता जमवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, छापेमारीनंतर केलेल्या प्राथमिक मूल्यांकनात हे प्रमाण सुमारे ५६० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. काही मालमत्ता पत्नीच्या तसेच अन्य खासगी व्यक्तींच्या नावावर खरेदी केल्याचाही तपास यंत्रणांना संशय आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील सुधारित तरतुदींनुसार कलम १३(१)(ब) आणि १३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकायुक्त महानिरीक्षक मनोज कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महासंचालक योगेश देशमुख यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. जप्त मालमत्तांचे सविस्तर मूल्यांकन आणि जमीन व्यवहारांची पडताळणी सुरू आहे. त्यानंतर बेहिशेबी संपत्तीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


