जालंधर : मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी आणि ती स्वतःसोबत भाग्य घेऊन येते, असं आपल्याकडे मानलं जातं. पंजाबमध्ये घडलेल्या एका घटनेनं हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. चिमुकलीच्या जन्मानं तिच्या वडिलांचं नशीब अवघ्या २४ तासांत पूर्णपणे पालटून टाकलं असून, एका सर्वसामान्य कुटुंबाला थेट करोडपती बनवलं आहे.
पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील बरेटा शहरात राहणारा २४ वर्षांचा युद्धवीर सिंग हा सुतारकाम आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा संसारगाडा हाकतो. त्याच्या घरात आर्थिक टंचाई नेहमीच होती. नुकतीच त्याची पत्नी हरमन हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. कुटुंबातील काहींना मुलगा हवा होता, त्यामुळे सुरुवातीला मुलगी झाल्यावर काहीशी नाराजीही व्यक्त झाली होती. परंतु, ही चिमुकली जन्माला आल्यावर अवघ्या काही तासांतच या कुटुंबाचे भाग्य असे उजळले की, सर्वांचेच डोळे विस्फारले.
घटना अशी घडली की, ४ नोव्हेंबर रोजी युद्धवीर आपल्या गरोदर पत्नीला तपासणीसाठी मानसा येथील दवाखान्यात घेऊन जात होता. वाटेत बुधालाडा येथील एका दुकानाजवळ थांबून त्याने मोबाईल नंबर पोर्ट करण्याचे काम केले. नेमका त्याच वेळी दुकानाबाहेर उभ्या असताना त्याने सहजच विचार करून एक लॉटरीचे तिकीट विकत घेतले. त्याची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असल्याने, दवाखाना आणि औषधोपचारांसाठी त्यांना एक-एक रुपया जपून खर्च करावा लागत होता. त्यामुळे युद्धवीरने लॉटरीचे तिकीट घेतलेले त्याच्या पत्नीला अजिबात आवडले नव्हते. असे तिकीट घेऊन पैसे वाया घालवू नका, असे ती त्याला म्हणाली होती. मात्र, हेच तिकीट त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे, याची कोणालाही कल्पना नव्हती.
नशिबाचा खेळही अजब असतो. ६ नोव्हेंबरला युद्धवीर बाबा बनला आणि ठीक दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या लॉटरीच्या निकालात त्याला थेट दीड कोटी रुपयांचे पहिले बक्षीस लागले. 'पंजाब स्टेट डियर २००' या मासिक लॉटरीचे हे प्रथम क्रमांकाचे ते इनाम होते. एका रात्रीत हाती आलेल्या या अफाट संपत्तीमुळे या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपल्या घरात या चिमुकलीने खऱ्या अर्थाने भाग्य आणि समृद्धी आणली आहे, असा ठाम विश्वास या कुटुंबाला वाटू लागला. याच कृतज्ञपोटी युद्धवीर आणि त्याच्या पत्नीने आपल्या कन्येचे नाव 'बरकत' असे ठेवले आहे, ज्याचा अर्थ समृद्धी असा होतो. पैशांपेक्षाही लेकीचे येणे हेच या कुटुंबासाठी जगातील सर्वात मोठे सुख ठरले आहे.


