पणजी : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. महिला आणि मुलींवरील अत्याचाराचा घटना वाढत आहेत. राज्यातील गुन्हेगारी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जनता याला कंटाळली आहे. जनता आपला राग येणाऱ्या निवडणुकीत दाखवून भाजपला सत्तेबाहेर काढेल. त्यानंतर काँग्रेस सरकार आल्यावर कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची असते हे आमचे सरकार दाखवून देईल असे प्रतिपादन काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी केले.
गुरुवारी पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस महासंचालकांची भेट घेतली. पणजीकर यांनी सांगितले की, आज आम्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस महासंचालकांसोबत चर्चा करण्यास आलो होतो. मात्र आम्हाला पोलीस मुख्यालयाच्या गेट जवळ अडवण्यात आले. पोलीस मुख्यालयाचे गेट बंद करणे यातूनच भाजप सरकारची मानसिकता समजते. यानंतर काही वेळाने आम्हाला पोलीस महासंचालक आम्हाला भेटले. त्यांना आम्ही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती समजावून सांगितली. पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ, वाहने असल्याचे त्यांनी कबूल केले. भविष्यात असे प्रकार होणार नाहीत यासाठी आय बीट प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले.
पुढील दोन महिन्यांत राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल असेही त्यांनी सांगितले. कदाचित त्यांना देखील माहिती असावी की पुढील दोन महिन्यात भाजप सरकार जाऊन काँग्रेस सरकार येणार आहे. याआधी आम्ही प्रत्येक पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार होतो. मात्र पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आश्वासनानंतर आम्ही हे मोर्चे तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा लहान राज्य असले तरी येथील गुन्हेगारी दर अधिक आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत येथे महिला, बालक तसेच लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक असल्याचे पणजीकर यांनी सांगितले.


