सरकारी कर्मचारी स्वतःला ‘बॉस’ तर जनतेला ‘सर्व्हंट’ समजतात! : मंत्री सुभाष शिरोडकर

डिचोली कार्यालयातील मंत्र्यांच्या पाहणीत २ ते ३ कर्मचारीच वेळेत उपस्थित; सरकारी कर्मचारी स्वत:ला ‘बॉस’ तर जनतेला ‘सर्व्हंट’ समजत असून, कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची संस्कृती नाही. त्यामुळे कधीही यायचे, कधीही जायचे, हवी तेव्हा रजा घ्यायची असे प्रकार घडत असल्याची खंत जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
39 mins ago
सरकारी कर्मचारी स्वतःला ‘बॉस’ तर जनतेला ‘सर्व्हंट’ समजतात! : मंत्री सुभाष शिरोडकर

पणजी :  सरकारी कर्मचारी स्वत:ला ‘बॉस’ तर जनतेला ‘सर्व्हंट’ समजत असून, कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची संस्कृती नाही. त्यामुळे कधीही यायचे, कधीही जायचे, हवी तेव्हा रजा घ्यायची असे प्रकार घडत असल्याची खंत जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर (Water Resources Minister Subhash Shirodkar) यांनी व्यक्त केली.

आज बुधवारी सकाळी ९.३० वाजता मंत्री शिरोडकर यांनी डिचोलीतील जलस्त्रोत खात्यात जाऊन कर्मचाऱ्यांची उपस्थिती प्रत्यक्ष पाहिली. यावेळी केवळ दोन ते तीनच कर्मचारी वेळेत उपस्थित असल्याचे दिसून आले. बरेच कर्मचारी कार्यालयात फिरकलेच नसल्याने कार्यालय खुले दिसत होते. जलस्त्रोत खात्यातील ही परिस्थिती पाहिल्यावर मंत्री शिरोडकर यांनी वरील उद्गार काढले.

मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, आज सकाळी एका कॅनलची पाहणी करायची असल्याने आपण सकाळीच त्या परिसरात गेलो होतो. कालच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते की, ६० हजार सरकारी नोकर असूनही जनतेची कामे होत नाहीत. या पार्श्वभूमीवर सकाळी लवकर बाहेर पडलो आणि ९.३० पर्यंत जलस्त्रोत खात्याच्या कार्यालयात जाऊन पाहणी केली असता केवळ दोन ते तीन कर्मचारी वेळेत उपस्थित असल्याचे दिसून आले.

एकूण भयानक अशी ही स्थिती असून, सरकारी कर्मचारी सकाळी १० ते ११ नंतर कार्यालयात आल्यावर जनतेची कामे कशी होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काम करण्याची संस्कृती (वर्क कल्चर) नसल्याने असे प्रकार घडत आहेत. सरकारी कर्मचारी स्वत:ला  ‘बॉस’ समजतात आणि जनतेला आपले ‘सर्व्हंट’ समजतात. त्यातूनच अशी मानसिकता तयार होते. 

कामात हलगर्जीपणा करणे, हवे तेव्हा कार्यालयात येणे, हवे तेव्हा जाणे आणि हवी तेव्हा रजा घेणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे जनतेची कामे होत नाहीत. लोकांची तशीच पडून राहत आहेत.  आज सकाळी १० पर्यंत येथे थांबून कारकून, अभियंते, कार्यकारी अभियंते किती पर्यंत येतात ते पाहणार असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नसून, कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ‌दिली.

जनतेची कामे वेळेत पूर्ण करणे आणि नागरिकांशी जबाबदारीने वागणे हे सरकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांकडून लोकांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते किंवा त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही. या प्रवृत्तीत बदल होणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारी यंत्रणेत कामाची शिस्त आणि जबाबदारीची जाणीव पुन्हा निर्माण झाली पाहिजे, असे  मंत्री शिरोडकर म्हणाले.

कालच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावेली मतदारसंघातील ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात राज्यात ६० हजार सरकारी कर्मचारी असूनही जनतेची साधी कामे वेळेत होत नसल्याचे सांगितले होते. जनतेची कामे वेळेत करण्याची तंबी दिली होती. आणि आज मंत्री शिरोडकर यांनी पाहणी केली असता; दोन ते तीन कर्मचारी सोडून इतर कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. 

हेही वाचा
सर्व पहा