पणजी : राज्यात चार दिवसांच्या आत दोन ४ वर्षांच्या बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. या दोघांवरही जलद खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. काणकोण येथे चार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक केलेल्या मोहम्मद हुसेन (वय २४, बिहार) याला काणकोण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गेल्या चार दिवसांत राज्यात घडलेल्या तीन लैंगिक अत्याचारप्रकरणात अटक केलेले तिघेही गोव्याबाहेरील राज्यांतील आहेत. (Four days three sexual assault incidents; arrested three from outside Goa.)
अटक केलेल्या संशयिताला पोलिसांनी काणकोण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात हजर केले. यावेळी तपासाच्या दृष्टीने अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
दरम्यान, गेल्या चार दिवसांत राज्यात दोन चार वर्षांच्या बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याने, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी राजकीय पक्षासहीत विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, बिगर सरकारी संघटना तसेच सर्वच स्तरातून या निंदनीय प्रकाराचा निषेध केला जात आहे. त्याचबरोचर आरोपींवर जलद खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी करणारी निवेदने पोलिसांना दिली जात आहेत.
अटक केलेले तिघेही गोव्याबाहेरील
गेल्या चार दिवसांत राज्यात चार लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यात अटक केलेले तिघेही संशयित गोव्याबाहेरील राज्यांतील आहेत. म्हापसा येथे चार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेला पुंडलिक गुडगे (२८ वर्षे) हा फुगे विक्रेता मूळ धारवाड, कर्नाटक येथील आहे. काणकोण येथे चार वर्षांच्या मुलीवरील अत्याचारप्रकरणातील मोहम्मद हुसेन हा बिहार येथील आहे. कुडचडे येथे मध्यप्रदेश येथील विवाहित महिलेवर नोकरी देण्याच्या बहाण्याने बलात्कार केलेला रॉबिन एम. (३० वर्षे) हा युवक मूळ मेघालय येथील आहे. त्यामुळे गोव्यात बाहेरील राज्यांतील व्यक्तींकडून गुन्हेगारी वाढत असल्याच्या माहितीला दुजोरा मिळत आहे. त्याचबरोबर त्यांच्याविरुद्ध रोषही वाढत आहे. अनोळखी व्यक्तींना वास्तव्यासाठी भाड्याची खोली, हॉटेल रूम देताना त्यांची सविस्तर माहिती घेऊन पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


