पेडणे : नदीतील वाळूचा बेकायदेशीर उपसा करून तिची वाहतूक केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी (Mandrem Police Station) ट्रकचालक पप्पू कुमार सिंह (३६) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आगारवाडा-चोपडे येथे हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता नदीतील वाळूचा उपसा केला. त्यानंतर ही वाळू ट्रकमध्ये भरून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. जप्त करण्यात आलेल्या वाळूची अंदाजे किंमत ८ हजार रुपये असल्याचे समजते.
नदीतील नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेकायदेशीर उपसा करून वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मांद्रे पोलीस करीत आहेेत.
दरम्यान, पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून गोव्यात नदीत वाळू उपसा करण्यास बंदी आहे. न्यायालयानेही वाळू उपशावर बंदी घातली आहे. तरीही कायद्यांचे उल्लंघन करून वाळू उपसा केला जात आहे. बेकायदेशीररित्या वाळू उपसा करून विक्री करण्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरण कार्यकर्त्यांनी केली आहे. राज्यात बांधकामांसाठी लागणारी वाळूची गरज लक्षात घेऊन सरकार कायदेशीररित्या वाळू काढण्यासाठी जागा निश्चित करण्याच्या विचारात आहे.


