पणजी : मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) (Chief Election Commissioner घेतलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत आरजीच्या दोन्ही गटांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावल्याने अधिकृत आरजी पक्ष कोणाचा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पक्षात दोन गट झाले असता अधिकृत पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला (सीईओ) नाही. आमच्याकडे पत्रव्यवहार झालाच तर तो केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविला जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली.
मतदार यादीचा मसूदा देण्यासह मतदार यादी उजळणी संदर्भात सूचना जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला आरजीच्या दोन्ही गटांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. मनोज परब गटातील अजय खोलकर तर आमदार वीरेश बोरकर गटाच्या अध्यक्ष शविना शिरोडकर यांनी बैठकीला उपस्थिती लावली. यामुळे खरी आरजी कोणाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बाजू सादर करावी
याबाबत माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल म्हणाले, आमच्याकडे आरजीचा जो पत्ता नोंद झालेला आहे, त्या पत्यावर बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्र पाठवले होते. या पत्यावर पत्र पाठविल्यानंतर दोन प्रतिनिधी उपस्थित राहिले. कोणता गट अधिकृत आहे, याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपआपली बाजू सादर करायला हवी. केंद्रीय निवडणूक आयोगच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
खोलकर यांनाच सही करण्यास मान्यता
अजय खोलकर यांनाच सही करण्यास मान्यता दिली. शविना शिरोडकर यांना दिली नाही.याबाबत अधिक माहिती देताना शविना शिरोडकर म्हणाल्या, बैठकीला राजकीय पक्षांच्या कोणत्या प्रतिनिधींंनी हजेरी लावली, त्याची माहिती द्यावी, असे पत्र पक्षाने सीईओना दिलेले आहे. पत्राचे उत्तर आल्यानंतर खरे कोण व खोटे कोण? हे जनतेला कळणार आहे, असे ते म्हणाले.
बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्र आमच्याच पक्षाला आले होते. यामुळे आरजीचा प्रतिनिधी म्हणून मी बैठकीला उपस्थित होतो. शविना शिरोडकर बैठकीला का उपस्थित होत्या, ते मला माहिती नाही, असे अजय खोलकर बैठकीनंतर म्हणाले.


