हळदोणा येथे कुत्रे भुंकण्यावरून शेजाऱ्यांमध्ये मारामारी

वयोवृद्ध व्यक्ती जखमी; संशयित युवकाला अटक : हळदोणा येथे कुत्रे भुंकण्यावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन झालेल्या वादानंतर प्रदीप अच्यूत शिरोडकर या ७० वर्षीय वयोवृद्धाला जबर मारहाण करण्यात आली. तसेच संशयिताने आपला पिटबुल कुत्रा त्यांच्या अंगावर सोडला.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
14 mins ago
हळदोणा येथे कुत्रे भुंकण्यावरून शेजाऱ्यांमध्ये मारामारी

म्हापसा :  हळदोणा येथे कुत्रे भुंकण्यावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन झालेल्या वादानंतर प्रदीप अच्यूत शिरोडकर या ७० वर्षीय वयोवृद्धाला जबर मारहाण करण्यात आली.( Haldona : fight between neighbours over dogs barking) तसेच संशयिताने आपला पिटबुल कुत्रा त्यांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने चावा घेतला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी राहुल केरकर (वय ३३) या संशयित युवकाला अटक केली आहे.

ही घटना बुधवारी ११ रोजी रात्री ११ च्या सुमारास खैरुट, हळदोणा येथे घडली. याप्रकरणी सुशांत शिरोडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जखमी शिरोडकर व संशयित केरकर या शेजाऱ्यांचे पाळीव कुत्रे एकमेकांना जोरजोराने भुंकू लागले.

 या कुत्र्यांना गप्प करण्यासाठी प्रदीप व संशयित घरातून बाहेर आले. तेव्हा त्यांच्यात कुत्रे भुंकण्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन शिवीगाळीत होऊन मारामारीत झाले. संशयिताने प्रदीप शिरोडकर यांना लोखंडी सळीने जबर मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या एका हाताच्या बोटाचे हाड मोडले आहे. त्यानंतर संशयिताने आपला पिटबुल कुत्रा शिरोडकर यांच्या अंगावर सोडला. या कुत्र्याने त्यांच्या शरीराच्या विविध भागांचा चावा घेतला.

हा प्रकार दोन्ही कुटुंबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मध्यस्ती करून संशयिताच्या तावडीतून जखमीला वाचवले व नंतर रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. नंतर तिथून त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि गुरुवारी सकाळी गुन्हा नोंद करून संशयित राहुल केरकर याला अटक केली.

 याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (२) आणि संबंधीत कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमेय नाईक करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा