फायनान्स कंपनीने थकवली घरपट्टी; मुरगाव पालिकेने ठोकले टाळे

५ लाख ८८ हजार रुपयांची सुधारित घरपट्टी थकवली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
फायनान्स कंपनीने थकवली घरपट्टी; मुरगाव पालिकेने ठोकले टाळे

येथील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाने सुधारित घरपट्टीची थकबाकी न भरल्याने मुरगाव पालिकेने गुरुवारी या शाखेला टाळे ठोकले. संबंधित कार्यालयाच्या व्यवस्थापकाने गेल्या काही वर्षांपासून घरपट्टीची थकबाकी भरण्यास टाळाटाळ चालविल्याने पालिकेने ही कारवाई केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहर भागातील एका इमारतीत या फायनान्स कंपनीचे वास्को कार्यालय कार्यरत आहे. पालिकेने घरपट्टी दरात सुधारणा केल्याने करात वाढ झाली होती. मात्र, या कार्यालयाने गेल्या चार ते पाच वर्षांपासून जुन्याच दरानुसार घरपट्टी भरली आणि सुधारित दराची फरक रक्कम देण्यास टाळाटाळ केली. यामुळे थकबाकीचा आकडा ५ लाख ८८ हजार रुपयांवर पोहोचला.

नोटीस देऊनही दुर्लक्ष झाल्याने कारवाई

थकबाकी न फेडल्यास परवान्याचे नूतनीकरण करण्यास अडचण येते, याची कल्पना असूनही शाखेकडून केवळ आश्वासने दिली जात होती. यापूर्वी मुरगाव पालिकेचे माजी मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी या शाखेला नोटिसा बजावल्या होत्या.

नाईक यांची बदली झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता; मात्र पालिकेने गुरुवारी कार्यालयातील सर्वांना बाहेर काढून शाखेला अखेर टाळे ठोकले.