पणजी : बदलत्या गोव्याचे वास्तव, विनोदाच्या माध्यमातून मांडणाऱ्या ‘गुडबाय मिस्टर डी’मेलो’ ( ‘Goodbye Mr D’Mello’ ) या आगामी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या चित्रपटाची निवड प्रतिष्ठित व्हेवस (WAVES FILM BAZAR) फिल्म बाजाराच्या ‘को-प्रॉडक्शन मार्केट फीचर’ विभागासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय निर्माते, गुंतवणूकदार आणि चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे.
२० ते २४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या व्हेवस फिल्म बाजारासाठी पाच देशांतील आणि १५ भाषांमधील एकूण २० चित्रपट प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘गुडबाय मिस्टर डी’मेलो’चा समावेश आहे. या निवडीमुळे गोव्याच्या चित्रपट क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
रिधम जानवे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. रिधम जानवे आणि मायाभूषण नागवेकर यांनी मिळून चित्रपटाचे लेखन केले आहे. कोकणी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट साकारण्यात येणार आहे.
विकास कुमार, खान अँड कुमार मीडिया या निर्मिती संस्थेचे शरीब खान आणि मायाभूषण नागवेकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. खान अँड कुमार मीडिया निर्मित ‘साँग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’ (२०२५) आणि ‘लव्हर्स इन द ब्लू नाइट’ (२०२६) या चित्रपटांनी व्हेनिस चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवले आहेत.
‘गुडबाय मिस्टर डी’मेलो’मध्ये संक्रमणाच्या टप्प्यातून जाणाऱ्या गोव्याचे चित्र विनोदी, पण तितक्याच मार्मिक पद्धतीने मांडण्यात येणार आहे. गोव्याच्या बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवाचे दर्शन घडवणारा हा चित्रपट ठरणार आहे.
व्हेवस फिल्म बाजाराच्या सहनिर्मिती बाजारपेठेत निवड झालेल्या चित्रपटांना आपली कथा, निर्मितीची संकल्पना आणि आर्थिक गरजा संभाव्य आंतरराष्ट्रीय भागीदारांसमोर मांडण्याची संधी मिळते. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती, आर्थिक पाठबळ आणि जागतिक चित्रपट क्षेत्रातील संपर्कांचे मार्ग खुले होतात. त्यामुळे ‘गुडबाय मिस्टर डी’मेलो’च्या पुढील प्रवासाकडे चित्रपट प्रेमींचे लक्ष लागले आहे.


