पणजी : गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय फार्मागुडी (Goa College of Enginneering Farmagudi), गोवा विद्यापीठ, ताळगाव येथील इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागाकडून डॉ. फेडोरा लिया डायस यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी पीएचडी प्रा. डॉ. अनंत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.
डॉ. फेडोरा लिया डायस यांनी "विंड पॉवर फोरकास्टिंग अँड मिटिगेशन ऑफ लो इनर्शिया इश्यूज इन डिस्ट्रिब्युटेड जनरेशन" (Wind Power Forecasting and Mitigation of Low Inertia Issues in Distributed Generation) या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला. त्यांचे हे संशोधन कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून पवन ऊर्जेचा अंदाज लावणे, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे आणि विजेच्या ग्रीडची स्थिरता टिकवून ठेवणे यांसारख्या आधुनिक आव्हानांवर आधारित आहे. त्यांनी चीनमधील एका आंतरराष्ट्रीय परिषदेतही आपला संशोधन निबंध सादर केला होता.
या यशाबद्दल बोलताना, डॉ. फेडोरा यांनी आपले मार्गदर्शक डॉ. अनंत नाईक यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. तसेच, आपल्या आई-वडील आणि कुटुंबाकडून मिळालेले प्रेम आणि सततचे सहकार्य या यशामध्ये अत्यंत महत्त्वाचे राहिल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. फेडोरा लिया डायस यांचे हे यश गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील भविष्यातील संशोधकांसाठी एक वस्तुपाठ ठरेल आणि गोव्यातील महिला अभियंत्यांसाठी खूप मोठे प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


