गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
गोवा देवभूमी आहे, तशीच ती ‘राखणदारां’ची भूमी आहे. गोव्यात गावागावांत ‘राखणदार’ गावाचे रक्षण करतात. शुभ कार्यात ‘राखणदारां’ना मान दिला जातो, तसेच नवस पूर्ण झाल्यावर ते पावतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. ‘राखणदारां’विषयी दै. ‘भांगरभूंय’ने ‘राखणदार’ या कॉफी टेबल पुस्तकाची निर्मिती करून गोव्याच्या संस्कृतीला पुस्तकरूपात आणण्याचे कौतुकास्पद काम केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
दै. ‘भांगरभूंय’तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेष कॉफी टेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आल्तीनो-पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘महालक्ष्मी’ शासकीय निवासस्थानी पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुस्तकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले. यावेळी दै. ‘भांगरभूंय’चे संपादक महेश दिवेकर, मुद्रक-प्रकाशक सागर लादे, वृत्त संपादक अमर पाटील आणि छाया पत्रकार नारायण पिसुर्लेकर उपस्थित होते. गोव्यात राखणदार संस्कृतीला मोठे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असून, गावाच्या सीमेवर राहून राखणदार संपूर्ण गावाची रक्षा करतो, या परंपरेवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रकाश टाकला. पत्रकारांनी या लोकसंस्कृतीचे केलेले दस्तऐवजीकरण गोव्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


