म्हापसा बाजारपेठेतील जलवाहिनी फुटल्याने व्यापार्‍यांचे नुकसान

फायर हायड्रन्टच्या दुरुस्तीवेळी घडला प्रकार


06th November, 11:35 pm
म्हापसा बाजारपेठेतील जलवाहिनी फुटल्याने व्यापार्‍यांचे नुकसान

म्हापसा बाजारपेठेतील फायर हायड्रन्टच्या दुरुस्तीवेळी फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करताना कामगार.
गोवन वार्ता
प्रतिनिधी
म्हापसा
वास्को येथील संडे मार्केटला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर म्हापसा नगरपालिकेने बाजारपेठेतील निकामी झालेले फायर हायड्रंट्स दुरुस्त केले आहेत. या दुरुस्तीवेळी एक मुख्य जलवाहिनी फुटल्याने मार्केटमध्ये पूरसदृशस्थिती निर्माण होऊन व्यापारी आणि ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
ही घटना शुक्रवार, ६ रोजी सांयकाळी घडली. शुक्रवारच्या आठवडा बाजार आणि दिवाळीनिमित्त खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी होती. जलवाहिनी फुटल्याने विक्रेते आणि व्यापारी वर्गाच्या मालाची नासाडी झाली. बाजारपेठेतील शकुंतलेच्या पुतळ्याजवळ असलेल्या फायर हायड्रंटशी जोडलेली जलवाहिनीमधून अचानक पाणी वाहू लागले. हजारो लीटर पाणी रस्त्यावर पसरल्यामुळे गटारे तुंबली आणि मुख्य रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे ग्राहकांना, विशेषतः कॅफे शांतादुर्गाकडील आळीमध्ये ये-जा करणे कठीण झाले.
म्हापसा व्यापारी संघटनेचे सचिव सिद्धेश राऊत यांनी सांगितले की, अलीकडेच केलेल्या पाहणीत परिसरातील अनेक फायर हायड्रंट्स निकामी असल्याचे आढळले होते, त्यानंतरच ही तातडीची दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली होती. राऊत म्हणाले, आणीबाणीच्या प्रसंगी उपयुक्त ठरणारी यंत्रणा कार्यान्वित असणे महत्त्वाचे आहेच; परंतु दिवाळीच्या खरेदीची मोठी गर्दी असताना आणि शुक्रवारचा आठवडा बाजार भरलेला असताना हे काम हाती घेतल्यामुळे सर्वांची गैरसोय झाली व नुकसानही सोसावे लागले. देखभालीसाठी जलवाहिनी खुली केली असता, मुख्य जलवाहिनीचे नुकसान झाले. हे काम सणानंतर करायला हवे होते.
दिवाळीत काम हाती घेतल्याबद्दल नाराजी
म्हापसा नगरपालिकेद्वारे फायर हायड्रंट दुरुस्तीचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटली होती. शुक्रवारी दुपारी जलवाहिनीमधून दाबासह पाण्याचा विसर्ग झाला तेव्हा ती अधिक फुटली. या प्रकारावर व्यापारी, विक्रेते आणि ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवाळीच्या सणानिमित्त आठवडा बाजारात गर्दी असणार हे माहीत असूनही, अशा वेळी हे काम का हाती घेतले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दुरुस्तीचे काम पूर्ण
जलवाहिनी फुटल्याचे समजल्यानंतर म्हापसा नगरपालिका आणि पेयजल पुरवठा खात्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला. परंतु साचलेले पाण्याचा विसर्ग होण्यास बराच वेळ गेला. त्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

हेही वाचा
सर्व पहा