गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या यंदाच्या ऑक्टोबर महिन्याच्या जीएसटी संकलनात २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये जीएसटीद्वारे ६८७ कोटी रुपये महसूल गोळा करण्यात आला आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन ५४३ कोटी रुपये होते. केंद्रीय अर्थ खात्याने नुकतीच ही माहिती जारी केली आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्रीय वाटा मिळण्यापूर्वी गोव्यातून ३०३ कोटी रुपये कर जमा झाला. ऑक्टोबर २०२५ मध्ये ही रक्कम २१५ कोटी रुपये होती. यंदा या रकमेत ४१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान केंद्र सरकारने गोव्यातून १,५६८ कोटी रुपये कर संकलित केला आहे. यामध्ये इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) द्वारे जमा केलेल्या ४८९ कोटी, सीजीएसटीद्वारे ५०४ कोटी, तर एसजीएसटीद्वारे जमा करण्यात आलेल्या ६१५ कोटी रुपयांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचा विचार करता एप्रिलमध्ये जीएसटी संकलन २.३१ लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. देशाचे जीएसटी संकलन मागील वर्षीच्या ऑक्टोबरपेक्षा २२.९ टक्क्यांनी जास्त आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये १.८८ लाख कोटी रुपये अधिक संकलन झाले होते.
महाराष्ट्रातून सर्वाधिक संकलन
ऑक्टोबर २०२६ मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ३५,१५० कोटी जीएसटी संकलन झाले. उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतील जीएसटी संकलन तुलनेने अधिक होते. ऑक्टोबरमध्ये मिझोरममधून सर्वात कमी ५० कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. मणिपूर, सिक्कीम या राज्यांतील जीएसटी संकलनही कमी होते. केंद्र सरकारने सप्टेंबर २०२५ मध्ये जीएसटीमध्ये कपात केली होती. यानंतर काही महिने संकलन काहीसे कमी झाले होते. मात्र त्यानंतर जीएसटी संकलनात वाढ होताना दिसत आहे.


