गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव
कदंब वाहतूक महामंडळाच्या बसमधील तिकीट तपासणी कडक केल्यानंतर महामंडळाच्या दैनंदिन महसुलात तब्बल दोन लाख रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली. तिकीट तपासणीतील कडकपणामुळे महसुलात झालेली ही वाढ लक्षात घेता, यापूर्वी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात गैरव्यवहार होत असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
कदंब महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नुकत्याच पणजी-सावंतवाडी बसमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत १५ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. या प्रकरणी संबंधित वाहकावर तत्काळ कारवाई करण्यात आली. तिकीट तपासणी वाढवल्यामुळे दररोज दोन लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळत आहे, असे आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले. या वाढीव उत्पन्नातून महामंडळाने १० नवीन बसगाड्यांची खरेदी केली आहे, असा दावाही तुयेकर यांनी केला.
दरम्यान, तिकीट तपासणी कडक केल्यानंतर महसुलात एवढी मोठी वाढ होत असल्याने यापूर्वी महामंडळाच्या उत्पन्नात गळती होत होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर तिकीट विक्री आणि वाहकांच्या कामकाजावर अधिक कडक देखरेख ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
सरकारकडून निधी मिळताच कर्मचाऱ्यांना देणार
कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित विविध मागण्यांसाठी गुरुवार, १२ नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. हा नियोजित संप टाळण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची मागणी प्रलंबित आहे. सरकारकडून या मागणीसाठी आवश्यक असलेला २४ कोटी रुपयांचा निधी मिळताच संबंधित रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असे आश्वासनही आमदार उल्हास तुयेकर यांनी दिले.


