फोंडा पालिका बैठकीत चर्चा करताना नगरसेवक.
गोवन वार्ता प्रतिनिधी
फोंडा
येथील क्रांती मैदानाजवळ सैन्य दलाच्या ताब्यात असलेल्या जागेचा करार संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. फोंडा पालिका मंडळ सदर जागा पुन्हा सैन्य दलाच्या ताब्यात देण्याच्या विरोधात असून करार न करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
फोंडा पालिकेची बैठक नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला मुख्याधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर व इतर नगरसेवक उपस्थित होते. बैठकीनंतर नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर म्हणाले की, क्रांती मैदानाजवळ असेलेली पालिकेची जागा पुन्हा पालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी स्व. रवी नाईक यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले होते. सध्या सैन्य दलाच्या ताब्यात आसलेल्या जागेचा करार संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. बैठकीत कराराविषयी चर्चा केल्यानंतर पुन्हा करार न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेच्या जागेवर रिवर फ्रंट प्रकल्प उभारण्याचे स्व. रवी नाईक यांचे स्वप्न होते. त्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे; पण काही जण प्रकल्प उभारण्याला विरोध करत असले तरी पालिका मंडळाने प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वरचा बाजारात नवीन मार्केट उभारण्यासाठी विक्रेत्यांसाठी खास जागेची निवड करण्यात आली आहे. विक्रेत्यांसाठी जागा तयार करूनच प्रकल्पाचे काम सुरू कारण्यात येणार आहे, असे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांनी सांगितले.


