पणजी : गोव्यातील स्थानिक काजूच्या टरफलांपासून मिळणाऱ्या तेलाचा (कॅश्यू नट शेल लिक्विड) वापर करून प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या संशोधनाला यश आले आहे. गोवा विद्यापीठाचे संशोधक गौरीश सावंत यांनी या विषयावर संशोधन पूर्ण केले असून, त्यांना यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. गौरीश सावंत यांनी हे संशोधन गोवा विद्यापीठाचे प्रा. डॉ. राजेश सुरेश प्रभु गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. ‘डेव्हलपमेंट, कॅरेक्टरायझेशन अँड स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ऑफ नॅचरल फायबर रीइन्फोर्स्ड कॅश्यू नट शेल लिक्विड मॅट्रिक्स कम्पोझिट’ हा त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा मुख्य विषय होता.
आपल्या या डॉक्टरेट संशोधनात त्यांनी गोव्यातील काजूच्या टरफलांचे तेल आणि नैसर्गिक धाग्यांचा (नॅचरल फायबर्स) वापर करून शाश्वत आणि पर्यावरणपूरक कम्पोझिट साहित्य विकसित व तपासित केले आहे. या संशोधनाचा मुख्य उपयोग हलक्या वजनाच्या बॅलिस्टिक संरक्षण यंत्रणांमध्ये (लाइटवेट बॅलिस्टिक प्रोटेक्शन सिस्टीम्स) म्हणजे सैन्यासाठी लागणारी सुरक्षित चिलखते किंवा बुलेटप्रूफ जॅकेट्स बनवण्यासाठी होऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
स्थानिक पातळीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून प्रगत अभियांत्रिकी साहित्य कसे विकसित केले जाऊ शकते, हे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. डॉ. गौरीश सावंत यांच्या या यशस्वी संशोधनामुळे शाश्वत आणि संशोधन-आधारित नवोपक्रमांच्या क्षेत्रात गोव्याचे नाव उंचावले असून, या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


