मिरामार येथे ग्राहकांची लूट; २० रुपयांची कुल्फी ५० रुपयांना!

गोवा कॅनचा आरोप : पर्यटकांची फसवणूक रोखण्याची मागणी


2 hours ago
मिरामार येथे ग्राहकांची लूट; २० रुपयांची कुल्फी ५० रुपयांना!

पणजी : मिरामार येथे नामांकित आईस्क्रिम ब्रँडच्या २० रुपये एमआरपी असलेल्या शाही कुल्फीची ५० रुपये दराने विक्री केली जात असल्याचा आरोप गोवा सिव्हिक अँड कन्झ्युमर ॲक्शन नेटवर्क (गोवा कॅन) या ग्राहक संघटनेने केला आहे. संघटनेने केलेल्या अचानक तपासणीत ही बाब निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.

‘ग्राहकांच्या जाणून घेण्याच्या हक्कासाठी’ या मोहिमेअंतर्गत दक्षता जागृती सप्ताहानिमित्त ही तपासणी करण्यात आली. कुल्फीच्या छापील कमाल किरकोळ किमतीपेक्षा ३० रुपये जादा आकारले जात असल्याने ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याची चिंता गोवा कॅनने व्यक्त केली.

वजन व माप खात्याकडून अशाप्रकारच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अचानक तपासण्या का केल्या जात नाहीत, असा सवालही संघटनेने उपस्थित केला. पॅकबंद वस्तूंची विक्री संबंधित नियमांनुसार होत आहे की नाही, यावर खात्याने नियमित देखरेख ठेवण्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

या प्रकरणात हस्तक्षेप करून पर्यटकांना अशाप्रकारच्या कथित जादा दराने होणाऱ्या विक्रीपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारे पत्र पर्यटन खात्याला पाठवण्याचा निर्णय गोवा कॅनने घेतला आहे. ग्राहकांचे हित जपण्यासाठी प्रभावी देखरेख आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरजही संघटनेने अधोरेखित केली.

पर्यटकांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा

संबंधित विक्रेत्याने पर्यटक हे आपले प्रमुख ग्राहक असल्याचे सांगितल्याचा दावा गोवा कॅनने केला आहे. स्थानिक दर आणि ग्राहकांच्या हक्कांची पुरेशी माहिती नसलेल्या पर्यटकांकडून जादा पैसे आकारले जाण्याची शक्यता असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली.

हेही वाचा
सर्व पहा