फोंडा : गोव्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना (Sanjivani Sugar Factory, Goa) ६-७ वर्षांनंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्रातील क्रेडो इम्पॅक्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे संजीवनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
त्यामुळे संजीवनी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक व कामगार अच्छे दिन येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र सरकारने विधानसभा निवडणुकीसाठी संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याचा स्टंट करू नये असे आवाहन ऊस उत्पादकांनी केले आहे.
संजीवनी साखर कारखान्याच्या सभागृहात बुधवारी सकाळी कृषी खात्याचे संचालक चंद्रहास देसाई, प्रशासक नितीन बखले, क्रेडो इम्पॅक्स प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी शंतनू कुलकर्णी व ऊस उत्पादकांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. बैठकीत कारखाना पुढील वर्षापासून सुरू करण्यासाठी लवकरच आवश्यक प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यात ऊस उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न, कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेपलीकडून ऊस आयात करणे, गोव्यातील ऊस कापणीचा खर्च उचलणे व अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संजीवनी साखर कारखान्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात करण्याचा निर्णय सुद्धा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसेच दिवाळीनंतर राज्यातील विविध भागात ऊस उत्पादकांच्या बैठका घेण्यात सुरुवात करून पुढील वर्षापासून कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून कारखाना कंपनीच्य ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच कामगारांचा प्रश्न सुद्धा सोडविण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले आहे.
राज्य सरकारने कारखाना बंद केल्यानंतर केंद्र सरकारच्या कृषी खात्यामार्फत कारखाना सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सहकार खात्याकडे असलेला संजीवनी साखर कारखान्याचा कृषी खात्यात समावेश करून घेतला. पण कारखाना सुरु करण्याची प्रक्रिया कधीच झाली नाही. त्यानंतर ऊस उत्पादकांनी आंदोलन केल्यानंतर कारखाना सुरु करण्यासाठी कंपनी तयार असल्यास चर्चा करून प्रक्रिया करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते.
त्यानुसार ऊस उत्पादकांनी एका कंपनीला राजी करून चर्चा केली. त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून सर्व कामगारांना कारखान्यात सामावून घेण्याचे तसेच सरकारी खात्यात दरवर्षी १ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल देण्याचे आश्वासन दिले होते. तरी सुद्धा सरकारने गांभीर्याने निर्णय घेतला नव्हता. पण विधानसभा निवडणुका जवळ आल्याने कारखाना पूर्णा सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची चर्चा स्थानिक लोक करू लागले आहेत.
पुढील वर्षी कारखाना सुरू करणार : कृषी संचालक
कृषी खात्याचे संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले की, सरकारने संजीवनी सुरू करण्यासाठी प्रक्रिया करून महाराष्ट्रात येथील क्रेडो इम्पॅक्स प्रायव्हेट लिमिटेडची निवड केली आहे. लवकरच करार करून कारखान्याच्या दुरुस्तीचे काम कंपनी करणार आहे. बुधवारी ऊस उत्पादक संघटनेबरोबर झालेली चर्चा यशस्वी ठरली आहे. पुढील वर्षी कारखाना सुरू केला जाणार आहे. ऊस उत्पादकानी मोठ्या संख्येने ऊस उत्पादन घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा लाभ कारखान्याच्या अवलंबितना मिळणार असल्याचे सांगितले.
ऊस उत्पादकांना मदत करण्याचे आश्वासन:राजेंद्र देसाई
गोमंतक ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी कारखाना बंद झाल्यापासून सरकार प्रत्येक निवडणुकीवेळी कारखाना सुरू करण्याचे आश्वासन देत होते.बुधवारी झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधीकाऱ्यांनी कारखाना सुरू करताना ऊस उत्पादकांना पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
सरकारकडे करार केल्यानंतर राज्यातील ऊस उत्पादकांच्या बैठका घेऊन त्यांना जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कारखाना सुरू करण्याच्या आश्वासन मिळाल्यामुळे काही ऊस उत्पादक सरकारने निवडणुकीचा स्टंट करू नये नये अशा प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.


