लागा तयारीला; जेईई मेन २०२७च्या पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

पूर्ण माहिती, लिंक खाली आहे; अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन २०२७ च्या (JEE Main 2027) पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
लागा तयारीला; जेईई मेन २०२७च्या पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन २०२७ च्या (JEE Main 2027)  पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार आहे. ही संगणक आधारित परीक्षा २० ते २८ जानेवारी २०२७ या कालावधीत घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. नोंदणी प्रक्रिया २४ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. नियमित मुदतीत अर्ज न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान ५०० रुपये विलंब शुल्क भरून अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा

एनटीएने (NTA)  जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुदत देण्यात आली आहे. परीक्षेसाठी केंद्र असलेल्या शहरांची यादी ३० डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना १३ जानेवारी २०२७ पासून प्रवेशपत्रे उपलब्ध होतील.

जेईई मेनच्या पहिल्या सत्राची परीक्षा २०, २१, २२, २३, २४ आणि २८ जानेवारी २०२७ या तारखांना होणार आहे. या परीक्षेतील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना देशातील विविध नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशाची संधी मिळते.

अर्ज कसा कराल?

विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पहिल्या सत्राच्या ऑनलाईन अर्जाची लिंक निवडावी. त्यानंतर ‘न्यू रजिस्ट्रेशन’ या पर्यायाद्वारे नोंदणी करून आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी. मागितलेली छायाचित्रे, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा. अर्जाची प्रत भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावी.

कोणते विद्यार्थी पात्र?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच सध्या बारावीत शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी वयोमर्यादा नसल्याने पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्जाची अंतिम मुदत लक्षात ठेवून वेळेत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा
सर्व पहा