नवनिर्वाचित अध्यक्ष वालंका आलेमांव यांच्यासोबत चर्चिल आलेमांव व इतर.
गोवन वार्ता। क्रीडा प्रतिनिधी
पणजी
गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) अध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत वालंका आलेमांव यांनी विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार तथा मावळते अध्यक्ष डॉ. कायतानो फर्नांडिस यांचा पराभव केला. वालंका यांना ८३, तर कायतानो यांना ६७ मते मिळाली. विशेष म्हणजे त्या जीएफएच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत.
या विजयासह ‘जीएफए’च्या नेतृत्वात मोठा बदल झाला असून पुढील कार्यकाळासाठी नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे. वालंका यांनी यापूर्वी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) कार्यकारी समितीवरही काम केले आहे. आता राज्यामध्ये स्पर्धांचे आयोजन, स्थानिक क्लबना प्रोत्साहन, युवा खेळाडूंना संधी आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर त्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच खेळाडूंचे हित आणि क्लबचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष असणार आहे.
विजयाचे श्रेय गोमंतकीयांना : वालंका
हा विजय केवळ आपला नसून संपूर्ण गोमंतकीय फुटबॉल, गोव्यातील जनता आणि चर्चिल आलेमांव यांनी फुटबॉलसाठी केलेल्या कार्यावर विश्वास दाखवणाऱ्या सर्व क्लबचा आहे, असे वालंका आलेमांव यांनी सांगितले. संघटनेच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणे तसेच गोव्याच्या फुटबॉलला त्याचे गतवैभव मिळवून देणे हा या विजयामागचा मुख्य उद्देश असून, अवघ्या तीन दिवसांपेक्षा कमी वेळेत सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या अथक परिश्रमांमुळेच हे शक्य झाले, असेही वालंका आलेमांव यांनी स्पष्ट केले.


