शिवशंकर मयेकरसह ७ संशयितांविरोधात खटल्याची कार्यवाही न्यायालयात सुरू

हणजूण, आसगाव कोमुनिदादची जमीन हडप प्रकरण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
27th October, 11:53 pm
शिवशंकर मयेकरसह ७ संशयितांविरोधात खटल्याची कार्यवाही न्यायालयात सुरू

पणजी : हणजूण आणि आसगाव कोमुनिदादच्या जमीन हडप प्रकरणात मुख्य संशयित शिवशंकर मयेकर याच्यासह सात जणांविरोधात मेरशी येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत कारवाईसाठी प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) आरोपपत्राची दखल घेतली. न्यायमूर्ती विजया आंब्रे यांनी हा आदेश दिला.
हणजूण आणि आसगाव येथील कोमुनिदादची जमीन बनावट दस्तावेजांच्या आधारे हडप केल्याची तक्रार कोमुनिदादच्या अटर्नीने म्हापसा पोलिसांत केली होती. संबंधित जमीन १९५२ मध्ये बनावट विक्रीपत्राद्वारे हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एप्रिल २०२५ मध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगच्या संशयावरून तपास सुरू केला.

तीन कंपन्यांचाही आरोपपत्रात समावेश
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात मयेकर याच्यासह यशवंत सावंत, सुदेश पार्सेकर, संजय सिरसाट, गिरीश राघा, उमर जाहूर शाह आणि नीरज शर्मा या सात संशयितांचा, तसेच आश्रय रिअल इस्टेट डेव्हलपर्स, थिंकिंग ऑफ यू आणि जिऑजिकल इंजिनिअरिंग एलएलपी या तीन कंपन्यांचा समावेश आहे.
ईडीचे विशेष अभियोक्ता सिद्धार्थ सामंत यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप करून त्यातून मिळालेला पैसा विविध बँक खात्यांत वळवण्यात आल्याचा आरोप केला. तसेच जमिनींचा विकास करून त्या गुंतवणूकदारांना विकण्याद्वारे कथित काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी नमूद केले. या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याचा आदेश दिला.
१३ ठिकाणी छापे; रोकड, गाड्या जप्त
ईडीने ९ सप्टेंबर २०२५ रोजी हणजूण, आसगाव आणि हैदराबाद येथे १३ ठिकाणी छापे टाकले. या तपासात सुमारे १,२०० कोटी रुपये किमतीची आणि ३.५ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन हडप केल्याचा आरोप समोर आला. कारवाईदरम्यान ७२ लाख रुपये रोख, सात आलिशान गाड्या आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२५ रोजी ईडीने शिवशंकर मयेकर याला अटक केली.

हेही वाचा
सर्व पहा