चिंबल येथे टॅक्सीचालकावरील हल्लाप्रकरणी जुने गोवा पोलिसांकडून हेब्बाळी बंधूंना अटक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
25th October, 11:15 pm
चिंबल येथे टॅक्सीचालकावरील हल्लाप्रकरणी जुने गोवा पोलिसांकडून हेब्बाळी बंधूंना अटक

पणजी : चिंबल येथील सुभद्रा बार जंक्शनजवळ शनिवार, २४ रोजी सायंकाळी टॅक्सी चालक मन्सूर हजरत अली हेब्बाळी याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी संशयित इम्रान हेब्बाळी (३५) आणि दादापीर हेब्बाळी (२६) या दोघा बंधुंना अटक केली. दोघांना पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. याबाबतचा आदेश न्या. गजानन हळर्णकर यांनी दिला.

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मन्सूर याच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, शनिवार २४ रोजी दुपारी २ वाजता चिंबल येथील सुभद्रा बार जंक्शनजवळ त्यांच्या मुलावर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला केल्याचे म्हटले आहे. सदर हल्ला संशयित इम्रान हेब्बाळी आणि दादापीर हेब्बाळी व इतरांनी केला आहे. त्यावेळी संशयितांनी दंडुक्याने आणि चॉपरने तिच्या मुलाच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर, पायांवर आणि शरीराच्या इतर भागांवर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर दुखापत पोहोचवली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुने गोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याच दरम्यान मन्सूर हजरत अली हेब्बाळी याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोहर धुळापकर यांनी वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. दोघांना रविवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयितांना सहा दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा