खून प्रकरणातील जन्मठेपेचा फरार कैदी सहा वर्षांनंतर जेरबंद

मालवणमधील देवबाग येथे ओळख लपवून वास्तव्य : पेडणे पोलिसांची महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने कारवाई

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
23rd October, 11:37 pm
खून प्रकरणातील जन्मठेपेचा फरार कैदी सहा वर्षांनंतर जेरबंद

पेडणे : येथील एका महिलेच्या खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर फर्लो रजेवर सुटून कारागृहात परत न आलेल्या कैद्याला पेडणे पोलिसांनी सुमारे सहा वर्षांनंतर महाराष्ट्रातील देवबाग- मालवण येथे पकडले. यशवंत ऊर्फ समीर दुर्गाराम भगत (रा. पणशीवाडा पेडणे) असे त्याचे नाव आहे. स्वतःची ओळख लपवून देवबाग येथील एका हॉटेलमध्ये आश्रय घेतलेल्या या फरार कैद्याचा शोध घेण्यात आला.

पोलिसांच्या अहवालानुसार, १८ सप्टेंबर २००२ रोजी पणशीवाडा पेडणे येथे ही घटना घडली होती. तक्रारदार चंद्रकांत यशवंत भगत यांच्या खोलीच्या खिडकीच्या गजांची कडी कापून यशवंत भगत याने आत प्रवेश केला आणि त्यांच्या पत्नी कविता चंद्रकांत भगत (वय ३७) यांच्या पोटावर चाकूने वार केले. कविता यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असताना २४ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी चंद्रकांत भगत यांच्या तक्रारीवरून पेडणे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यशवंत भगत याला १९ सप्टेंबर २००२ रोजी पहाटे अटक करण्यात आली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

या खटल्यात पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ नोव्हेंबर २००३ रोजी यशवंत भगत याला दोषी ठरविले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत त्याला जन्मठेप आणि तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच कलम ४५४ अंतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

शिक्षा भोगत असताना १५ ऑक्टोबर २०२० रोजी त्याची रजेवर सुटका करण्यात आली होती. मात्र, रजा संपल्यानंतर तो कोलवाळ कारागृहात परत हजर झाला नाही. तेव्हापासून तो फरार होता.

दरम्यान, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंत हा देवबाग मालवण येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती पेडणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल सागर खोर्जुवेकर, शशांक साखळकर आणि होमगार्ड शैलेश गावंडी यांचे पथक देवबाग येथे रवाना झाले. तेथे त्याला ताब्यात घेऊन पेडणे पोलीस स्थानकात आणण्यात आले.

त्याच्या शिक्षेचा उर्वरित कालावधी भोगण्याबाबत योग्य आदेश मिळण्यासाठी त्याला मेरशी येथील सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

पेडणे पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर, पेडणे उपविभागीय पोलीस अधिकारी आशीष शिरोडकर यांच्या देखरेखीखाली आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे.

देवबाग येथील हॉटेलमध्ये आश्रय

मालवण पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पथकाने त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. देवबाग येथील ‘फोर्ट व्ह्यू’ हॉटेलमध्ये आश्रय घेतलेल्या यशवंत याला ताब्यात घेऊन पेडणे पोलीस स्थानकात आणण्यात आले. 

हेही वाचा
सर्व पहा