चारित्र्यावर संशय घेऊन बेळगावात पत्नीची निर्घृण हत्या; पतीला अटक

दारूच्या नशेत वादातून हल्ला केल्याचा आरोप

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
17 mins ago
चारित्र्यावर संशय घेऊन बेळगावात पत्नीची निर्घृण हत्या; पतीला अटक

बेळगाव : शहरातील हनुमाननगर परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अश्विनी हेगडे असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती विठ्ठल हेगडे याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.
धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लिगवाड येथील अश्विनी आणि बैलहोंगल तालुक्यातील विठ्ठल यांचा सुमारे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. उदरनिर्वाहासाठी हे दाम्पत्य बेळगावात स्थायिक झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीत किरकोळ कारणांवरून वाद होत होते. विठ्ठल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता.
दसरा सणानिमित्त अश्विनी माहेरी गेली होती. आजारी सासऱ्यांना जेवण देण्यासाठी ती घरी आली असता, दारूच्या नशेत असलेल्या विठ्ठलने तिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घातला. या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात होऊन त्याने अश्विनीची हत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.
घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. विठ्ठलला अटक करण्यात आली असून, याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसऱ्याच्या सणादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आईला गमावलेल्या दोन मुलांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा