रोहन हरमलकरला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

हणजूण येथील जमीन हडपल्याचा आरोप : २२ रोजी सुनावणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
15th October, 11:46 pm
रोहन हरमलकरला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित रोहन हरमलकर याला म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि इतर अटींवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अटक करण्याची आवश्यकता भासल्यास या आदेशानुसार त्याची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
या प्रकरणाची सुरुवात २०२२ मध्ये हणजूण येथील सर्व्हे क्र. ४२६/५ मधील जमीन हडप केल्याच्या तक्रारीवरून झाली. त्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूणमधील सर्व्हे क्र. ४४४/८ संदर्भात दुसरा गुन्हा दाखल केला. जमीन व्यवहारांत मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरल्याचा संशय आल्याने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासात हस्तक्षेप केला.
२४ आणि २५ एप्रिल २०२५ रोजी ईडीने हरमलकर याच्या पिळर्ण, पर्वरी आणि दिवाडी येथील निवासस्थानांवर छापे टाकले. या कारवाईत एक हजार कोटी रुपयांहून अधिक बाजारमूल्य असलेल्या जमिनींशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच २१ मालमत्तांशी संबंधित कथित बनावट कागदपत्रे आढळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
या प्रकरणी गुन्हे शाखेने १० डिसेंबर २०२५ रोजी रोहन हरमलकर याच्यासह अल्कांत्रो डिसोझा, स्टिव्हन डिसोझा, मोहम्मद सुहैल आणि समीर सातार्डेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हरमलकर याने अटकपूर्व जामिनासाठी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्याला ५० हजार रुपये व इतर अटींवर सुटका करण्याचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

बनावट दस्तावेजांद्वारे मालमत्ता हडपल्याचा आरोप

तपास यंत्रणांच्या आरोपानुसार, बनावट फेरफार नोंदी, इन्व्हेंटरी कार्यवाही, इच्छापत्रे आणि अन्य दस्तावेजांचा वापर करून २१ मालमत्ता हडपण्यात आल्या. यामध्ये हणजूण, म्हापसा, नादोडा, कामुर्ली, रेवोडा आणि पर्रा येथील जमिनींचा समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.      

हेही वाचा
सर्व पहा