पणजी : हेडलँड सडा येथील ‘मुरगावचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अनधिकृत शेडचे उर्वरित पाडकाम पूर्ण झाले आहे. मात्र, या कारवाईदरम्यान सीमांकनासाठी गेलेल्या मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटनेची दखल घेत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने एमपीए आणि मुरगाव नगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
एमपीएने अनधिकृत शेडविरोधात २०२५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ९ सप्टेंबर २०२५ रोजी न्यायालयाने शेड पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, कारवाई न झाल्याने एमपीएने अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर मुरगाव नगरपालिकेने ३० सप्टेंबरपर्यंत कारवाई पूर्ण करण्याची हमी दिली होती. तरीही कारवाई न झाल्याने न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंतची अंतिम मुदत दिली. त्यानुसार शेड पाडण्यात आली.
मारहाणप्रकरणी दोन गुन्हे दाखल
सुनावणीदरम्यान एमपीएचे ज्येष्ठ वकील योगेश नाडकर्णी यांनी शेड पाडल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांना जमावाकडून मारहाण झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. या प्रकरणी मुरगाव पोलिसांनी सुमारे दहा जणांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यातील संशयित वेदांत विजय चोडणकर याने न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहितीही देण्यात आली. या घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने एमपीए आणि मुरगाव नगरपालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.


