म्हापसा : खाजने पेडणे येथील तृप्ती नितीन राऊळ (४२) हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी विवेक बाबी साळगावकर (३२, रा. खाजणे, पेडणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी फिर्यादी नितीन राऊळ यांनी १ सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवार १० ऑक्टोबर रोजी हा गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार संशयिताकडून एप्रिल २०२६ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडला होता. फिर्यादीच्या पत्नीने १८ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती.
संशयिताने वरील कालावधीत फिर्यादीच्या पत्नीला संदेश आणि फोन कॉलद्वारे असे भासवले की, तक्रारदाराचे अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचे सांगून तिला तक्रारदाराविरुद्ध भडकवले. खोटी माहिती देऊन केलेल्या या सततच्या छळामुळे आणि मानसिक त्रासामुळे आरोपीने तक्रारदार आणि त्यांची पत्नी यांच्यात वैवाहिक मतभेद निर्माण केले. या परिस्थितीमुळे फिर्यादींच्या पत्नीने कोलवाळ येथील शापोरा नदीत उडी मारून आपले जीवन संपवले.
या आरोपाखाली पोलिसांनी विवेक साळगावकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सनी काणेकर हे करीत आहेत.


