मुंबईतील ६१ वर्षीय वृद्धाला गोव्यातील ‘डेटिंग’ पडले ६ लाखांना!

हणजूण पोलिसांकडून सहा जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा नोंद

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
09th October, 10:01 pm
मुंबईतील ६१ वर्षीय वृद्धाला गोव्यातील ‘डेटिंग’ पडले ६ लाखांना!

म्हापसा : डेटिंग अॅपवर संपर्कात आलेल्या एका युवतीने आपल्या साथीदारांच्या मदतीने विलेपार्ले, मुंबई येथील ६१ वर्षीय वृद्धाला गोव्यात बोलावून तब्बल ६ लाखांहून अधिक रुपयांना लुबाडल्याची गंभीर घटना घडली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी चार युवतींसह एकूण ६ जणांविरुद्ध खंडणीचा आणि विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १० डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास बागा-हडफडे येथील ‘व्हिला व्हिटॅमिन-सी’मध्ये घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी ८ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंद केला आहे. संशयितांमध्ये चैताली लक्ष्मण क्षीरसागर, काव्या शर्मा आणि इतर चार अज्ञात संशयितांचा समावेश आहे.
संशयित चैताली क्षीरसागर हिने ‘टिंडर’ डेटिंग अॅपद्वारे फिर्यादीशी संपर्क साधून त्यांना गोव्याला येण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार, घटनेच्या आदल्या दिवशी ९ डिसेंबर रोजी ते गोव्यात आले आणि बागा-हडफडे येथील वरील व्हिलामध्ये उतरले.
काही वेळ, चैताली हिने संशयित काव्या शर्मा आणि एका अज्ञात महिलेला तिथे बोलावले. त्यानंतर त्यांनी बळजबरीने फिर्यादी आणि स्वतःचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न केला. इतक्यात तिथे दोन अज्ञात पुरुष आणि एक महिला व्हिलामध्ये घुसले.
आरोपींनी फिर्यादीला ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत बेदम मारहाण केली, अश्लील कृते करण्यास भाग पाडले आणि त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून ५० हजार रुपये रोख आणि ४५ हजार रुपये ऑनलाइन युपीआयद्वारे उकळले. एवढेच नव्हे तर त्यांच्या हातातील २० ग्रॅमची सोन्याची अंगठी, ४० ग्रॅम वजनाची सोनसाखळी आणि ७० हजार रुपये किमतीचे ‘राडो’ घड्याळ जबरदस्तीने हिसकावून घेतले. यानंतर सर्व संशयितांनी फिर्यादींना व्हिलामध्येच डांबून बाहेरून कडी लावून पळ काढला.
तीन महिन्यांनंतर धाडस दाखवत पोलिसांत तक्रार
घटनेनंतर फिर्यादी मुंबईला परतले. परंतु, अशा प्रकारची लज्जास्पद व मानहानीची घटना इतर कोणासोबतही घडू नये, या उद्देशाने त्यांनी घटनेच्या जवळपास तीन महिन्यांनंतर धाडस दाखवत हणजूण पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ११५(२), १२७(२) सह कलम ३(५) अन्वये खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा