फसवणूक करून सेरूला कोमुनिदादचे दोन भूखंड बळकावले

सुकूर येथील सेरूला कोमुनिदादचे ८१५ चौ. मी.चे दोन भूखंड बनावट दस्तावेजाद्वारे बळकावण्यात आले आहेत. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी साल्वादोर द मुंदचे उपसरपंच राजेश सावईकर, पंच रोशनी सावईकर या दांपत्यासह इतर अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


06th October, 11:38 pm
फसवणूक करून सेरूला कोमुनिदादचे दोन भूखंड बळकावले

गोवन वार्ता प्रतिनिधी
म्हापसा
सुकूर येथील सेरूला कोमुनिदादचे ८१५ चौ. मी.चे दोन भूखंड बनावट दस्तावेजाद्वारे बळकावण्यात आले आहेत. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी साल्वादोर द मुंदचे उपसरपंच राजेश सावईकर, पंच रोशनी सावईकर या दांपत्यासह इतर अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोमुनिदादचे अॅटर्नी पीटर मार्टिन्स यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. हा प्रकार २८ जून २०२२ पूर्वी घडला आहे.
संशयित राजेश सावईकर, रोशनी सावईकर व इतरांनी सामायिक उद्देशाने बनावट, खोटे दस्तऐवज तयार केले. यामध्ये २२ मे २००४ चे प्रमाणपत्र, ९ ऑक्टोबर १९९७ चे शासकीय राजपत्र, सेरुला कोमुनिदादचा ठराव, पेमेंट पावत्या, २४ नोव्हेंबर १९९४ चे प्रमाणपत्र आणि १ मार्च १९९६ च्या सरकारी पत्राचा समावेश आहे. तसेच कोमुनिदादचे भूखंड वाटप करण्याच्या अनिवार्य प्रक्रियेचे पालन न करता, सर्वेक्षण क्रमांक ३६२/१ मधील भूखंड क्रमांक २६ (ब) व (क) अनुक्रमे ३१५ चौ.मी. आणि ५०० चौ.मी. क्षेत्रफळ असलेली ही जमीन त्यांनी स्वत:च्या नावे हस्तांतरित करून घेतली.
संशयितांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस
संशयितांनी सेरूला कोमुनिदाद आणि सरकारी प्राधिकरणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस येताच कोमुनिदादतर्फे अॅटर्नी पीटर मार्टिन्स यांनी पोलिसांत तक्रार दिली. सोमवारी पोलिसांनी संशयित सावईकर दांपत्यासह इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२० सहकलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयितांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण करत आहेत.          

हेही वाचा
सर्व पहा