पणजी : जगात सर्वत्र महिला दिग्दर्शक असण्यासाठी तुम्हाला असाधारण असावे लागते. पण पुरुष दिग्दर्शकांच्या बाबतीत तशी अट नसते.
हे मी इतर चित्रपट निर्मात्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी म्हणत नाही. तर ही परिस्थितीची वास्तवता आहे. मला आशा आहे की, आपण अशा टप्प्यावर पोहोचू जिथे आपण केवळ चित्रपट निर्माते म्हणून ओळखले जाऊ. तिथे महिला आणि पुरुष चित्रपट निर्माते असा भेद नसेल असे प्रतिपादन महिला दिग्दर्शक सुझान अँड्र्यू यांनी केले.
इफ्फीच्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी दिग्दर्शक अलिना सर्बेन, नर्गिझा डॉटेईव्हा उपस्थित होत्या. यावेळी अभिषेक जैन यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुझान यांनी सांगितले की, महिला दिग्दर्शकांना किंवा त्यांच्या कथांना ठराविक प्रकारे सीमित केले जाते. वास्तविक असे करणे योग्य नाही. तुम्ही महिलांच्या कथा सांगत आहात, म्हणून तुम्हाला महिला या विशिष्ट श्रेणीत ठेवले जाऊ नये. त्याऐवजी, महिलांच्या कथा मानवी पातळीवर प्रत्येकासाठी मौल्यवान आहेत, हे समजून घेतले पाहिजे.
मात्र मला वाटते आपण अजून त्या टप्प्यावर पोहोचलेलो नाही. मी ज्या देशाचे प्रतिनिधित्व करते, त्या देशातून निर्माण झालेले आणि जागतिक स्तरावर पोहोचलेले अनेक सर्वोत्तम चित्रपट महिलांनीच दिग्दर्शित केले आहेत किंवा तयार केले आहेत.
त्या म्हणाल्या, चित्रपट निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात मला खूप त्रास झाला. मला अनेकांनी संधी नाकारली. पण त्यामागची कारणे सांगितली नाहीत. कधी नम्रपणे तर कधी उद्धटपणे नकार दिला. पण यामुळे मनात प्रश्न निर्माण झाले, कारण याच काळात मी अनेक कमी महत्त्वाचे चित्रपट प्रकल्प पूर्ण झाल्याचे पाहिले.
माझ्या चित्रपटाचा विषय कदाचित यामागील एक कारण असू शकेल. पण, दुसरीकडे असे अनेक चित्रपट होते ज्यात लोकांच्या विशेषतः स्त्रियांच्या हत्येचे चित्रण होते. ज्यासाठी त्यांना निधी मिळवण्यात कोणतीही अडचण आली नाही. परंतू मला एका चित्रपटाला निधी मिळवण्यासाठी दहा वर्षे काढावी लागली.
पूर्वज मूळचे राजस्थानचे
अलिना सर्बेन यांनी सांगितले की, आमचे पूर्वज मूळचे राजस्थान मधील होते. आमच्या आणि हिंदी भाषेत अनेक साम्य आहेत. एक हजार वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी रोमेनियात स्थलांतर केले. आज रोमेनियामध्ये या समाजाची लोक ८ ते १० टक्के आहेत.
मात्र तिथे आजही आम्हाला भेदभाव सहन करावा लागतो. आम्हाला कमी दर्जाचे समजले जाते. सिगाल म्हणजे गुलाम म्हणून हिणवले जाते. याचा राग माझ्या मनात कायम आहे. याला वाट देण्यासाठी मी आधी नाटकात काम सुरू केले. आणि कालांतराने मी चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
भारतात आल्याचे समाधान
अलिना यांनी सांगितले की, माझे पूर्वज हजारो वर्षांपूर्वी भारत सोडून गेले होते. आज मी पुन्हा माझ्या मातृभूमीत आले आहे याचे मला समाधान आहे. भारतात येऊन मी भाऊक झाले आहे.


