गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
वीरेश बोरकर यांना मीच ‘हिरो’ बनवले. त्यांना आमदार म्हणून मी घडवले आणि त्यांचा राजकीय अंतही मीच करणार. वीरेश यांना संपवणे हा माझा वैयक्तिक अजेंडा असेल, असा इशारा आरजीपीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी दिला. पक्ष लोकशाही मार्गाने चालवणे हीच माझी मोठी चूक ठरली. हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला असता, तर आज ही वेळ आली नसती, अशी खंतही परब यांनी व्यक्त केली.
‘प्रुडंट मीडिया’च्या ‘हेड ऑन’ या विशेष कार्यक्रमात मनोज परब बोलत होते. मनोज परब म्हणाले, आझाद मैदानावर उपोषण करण्याचा सल्ला मीच वीरेश यांना दिला होता. वीरेश यांनी नारळावर हात ठेवून याबाबत सत्य सांगावे. ‘ही चळवळ तू जाहीर केली आहेस, तर ती मोठी करूया,’ असे सांगणारा मीच होतो आणि त्यानंतरच वीरेश यांनी आझाद मैदानावर आंदोलन जाहीर केले, असा दावा परब यांनी केला.
बोरकर यांच्याबद्दल मला असूया वाटत असती तर मी त्यांचे नुकसान केले असते. मी त्यांना तिथेच संपवले असते. त्यांना आझाद मैदानावर नेऊन हिरो करण्याची मला गरज नव्हती. ते माझ्या पक्षाचे आमदार होते. माझा आमदार मोठा झाला तर पक्ष मोठा होईल, हाच माझा प्रामाणिक हेतू होता, असे परब यांनी स्पष्ट केले.
आझाद मैदान आणि टीसीपी फूटपाथ आंदोलनाचे नियोजन मीच केले होते. ‘तुम्ही वीरेशला मारायला निघाला आहात, त्याला आंदोलन मागे घ्यायला सांगा,’ असा दबाव वीरेशचे कुटुंबीय आणत होते. या आंदोलनामुळेच गोव्याला आणि वीरेश यांना आमदारकीची ताकद काय असते ते समजले. त्यामुळे ‘विरेशला मी घडवले आणि मीच संपवणार,’ हे मी अभिमानाने आणि आव्हान देऊन सांगतो, असे परब म्हणाले.
पूर्वी आम्ही इतर आमदारांवर टीका करायचो आणि आरोप करायचो, तसेच आज वीरेश वागत आहे. या नरकासुराला आम्हीच घडवले असून आता त्याचा वध करावाच लागेल. उद्या दुसरा आमदार निवडून आल्यास, त्याने असे पाऊल उचलण्यापूर्वी त्याच्या मनात भीती असायला हवी. हुकूमशहाप्रमाणे वागलो असतो, तर हे लोक केव्हाच पक्षाबाहेर फेकले गेले असते. मी पक्षात पारदर्शकता ठेवली, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जपले आणि लोकशाहीचा जप करत स्वतःचेच नुकसान करून घेतले. हुकूमशहा बनून पक्षाचे हित पाहिले असते, तर ही परिस्थिती ओढवली नसती, असेही ते म्हणाले.
मी वीरेश यांना मुलासारखे मानले होते. मात्र, मुलानेच बापाचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसल्याचे दुःख झाल्याने मी पक्ष सोडला. त्यानंतर पक्षावर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होऊ लागले. फसवणूक करून पक्ष ताब्यात घेण्यात आला आणि गोवा वाचवण्याची भाषा करणारे लोक ‘सेटिंग’ करून गोव्याचे मूळ प्रश्न बाजूला ठेवून राजकारण करू लागले. अखेर कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी माझी भेट घेऊन चिंता व्यक्त केल्याने, हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी मी पुन्हा परत आलो आहे, असे परब यांनी स्पष्ट केले.
भाजपला फायदा मिळवून देण्यासाठीच गिरीश चोडणकर आले
गिरीश चोडणकर यांनी यापूर्वी दोन वेळा विश्वासघात करून पक्ष फोडला आणि तरीही त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. आरजीपी वाढत असल्याने काँग्रेसच्या पोटात दुखत आहे, त्यामुळेच गिरीश यांच्या माध्यमातून काँग्रेसने पक्षात फूट पाडली आहे. आपले अस्तित्व संपेल या भीतीने काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्ष फोडून भाजपला फायदा मिळवून देण्यासाठीच गिरीश चोडणकर आले आहेत. मतांचे विभाजन करणे हा जुनाच खेळ आहे. भाजपचीच माणसे काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभी राहतील आणि गिरीश चोडणकर सोबत असताना २०२७ च्या निवडणुकीत १०० टक्के पक्षफूट होणारच, असा आरोप परब यांनी केला.
विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार : परब
आगामी निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल. गेल्या ६ महिन्यांपासून निवडणुकीचा विषय बाजूला ठेवून पक्षात परत येणे आणि पक्षाची पुनर्बांधणी करणे यावर चर्चा सुरू होती. पुढील १५ दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल; मात्र मी निवडणूक लढवण्यास पूर्णपणे तयार आहे, असे मनोज परब यांनी स्पष्ट केले.


