गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
मनोज परब यांच्या संदर्भातील ‘चॅप्टर ३’ लवकरच समोर येणार आहे. एक-एक गोष्टी या चॅप्टरमधून उघड होत आहेत आणि ‘चॅप्टर ३’मध्ये सर्व काही स्पष्ट होईल. सध्या काय सुरू आहे हे जनतेला चांगलेच ठाऊक असून, जनताच याबाबत योग्य तो कौल देईल, असे प्रत्युत्तर सांत आंद्रेचे आमदार आणि आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांनी मनोज परब यांना दिले आहे.
मनोज परब यांनी वीरेश बोरकर यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याची भाषा केली होती. यावर प्रतिक्रिया देताना बोरकर म्हणाले की, त्यांना कितीही आरडाओरडा करू द्या; गोमंतकीयांना आणि सांत आंद्रेच्या मतदारांना माझे काम चांगलेच माहीत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. परब यांनी हवे असल्यास माझ्या मतदारसंघातही निवडणूक लढवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
कोणाला घाबरण्याची गरज आहे आणि कोणाला नाही, हे मी सांगू शकत नाही. जनताच याबाबत निर्णय घेईल. मी अतिआत्मविश्वास बाळगू शकत नाही किंवा कोणाला संपवण्याची भाषाही करू शकत नाही. कोणाला संपवायचे आणि कोणाला सत्तेत ठेवायचे, हे सर्वस्वी जनतेच्या हातात आहे. मी निवडून येणे किंवा माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मतदारसंघ कोण सांभाळू शकतो, हा जनतेचा निर्णय असेल. मी जनतेला दोष देऊ शकत नाही; कारण खरे घडवणारे हे लोकच असतात, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.
बापाने चोरी केली, तरी तो चोरच ठरतो !
‘मी आरजीपीचा बाप आहे,’ या परब यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बोरकर म्हणाले की, बापाने चोरी केली, तरी तो चोरच ठरतो आणि अशा वेळी बोलावेच लागते. कोणी चुकीचे वागते, तेव्हा ते खपवून घेण्याऐवजी त्याला उत्तर द्यावेच लागते. महाभारतात श्रीकृष्णाने सांगितला विचार घेऊन पुढे जावे लागेल. पक्षात फूट पडली, त्याचे आम्हालाही खूप दुःख झाले. या घडामोडींमुळे आमच्याही भावना आणि संवेदना दुखावल्या आहेत; परंतु या सर्व गोष्टी मनात ठेवूनच पुढे वाटचाल करावी लागणार आहे, असेही आमदार वीरेश बोरकर यावेळी म्हणाले.


