कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; १९ टाऊट्सना अटक

चालू वर्षी ८४१ जणांवर कारवाई; कळंगुट आणि बागा परिसरात पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या १९ बेकायदा टाऊट्सना (दलाल) कळंगुट पोलिसांनी (Calangute Police) शनिवारी (दि. २१) रात्री रंगेहात पकडून अटक केली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; १९ टाऊट्सना अटक

म्हापसा : कळंगुट आणि बागा परिसरात पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या १९ बेकायदा टाऊट्सना (दलाल) कळंगुट पोलिसांनी (Calangute Police)  शनिवारी (दि. २१) रात्री रंगेहात पकडून अटक केली. बार्देश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या सर्व आरोपींना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली आहे.

कळंगुट आणि बागा समुद्रकिनारी बनावट सेवा, दिशाभूल आणि बेकायदेशीर आमिषे दाखवून पर्यटकांना लुटले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या या भागाची प्रतिमा मलिन करणाऱ्या दलालांना आळा घालण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले आहे.

याच मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक लक्ष्मी आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने समुद्रकिनारी भाग, वाहन पार्किंग तळ आणि मुख्य बाजारपेठेत विशेष गस्त घालून धडक कारवाई केली. यावेळी पर्यटकांना अडवून भुलथापा देणाऱ्या १९ जणांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १७० अन्वये अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेले सर्व संशयित आरोपी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि नेपाळ येथील रहिवासी असून ते सध्या बागा, कळंगुट व आसपासच्या परिसरात वास्तव्यास होते. दरम्यान, चालू वर्षभरात कळंगुट पोलिसांनी अशा प्रकारे पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या एकूण ८४१ टाऊट्सवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई केली आहे. आगामी पर्यटन हंगाम लक्षात घेता समुद्रकिनारे, गर्दीची ठिकाणे आणि बाजारपेठांमध्ये ही शोधमोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अटक करण्यात आलेले संशयित

शनिवारच्या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १९ जणांमध्ये श्रीकांत पालव (२९, सावंतवाडी-महाराष्ट्र), गोपालसिंग धामी (२८, नेपाळ), समीर हुसेन (३६, कन्नौज-उत्तर प्रदेश), साकिब लोहार (२१, जम्मू-काश्मीर), प्रकाश सोळंकी (३२, पश्चिम बंगाल), बद्रुद्दीन (२२, जम्मू-काश्मीर), गणपती पट्टायत (२९, बालेश्वर-ओडिशा), परदेश पवार (२८, नाशिक-महाराष्ट्र), अरबाज अली (२४, कन्नौज-उत्तर प्रदेश), शबान अली (२६, कन्नौज-उत्तर प्रदेश), किब्रिया मंडल (३३, दक्षिण दिनाजपूर-पश्चिम बंगाल), राजशेखर होसमणी (३०, धारवाड-कर्नाटक), मुरसलीन हुसेन (३२, कन्नौज-उत्तर प्रदेश), विनायक माळी (४१, कोल्हापूर-महाराष्ट्र), सुंदरलाल आर्य (२६, बक्सर-बिहार), सुदीप चव्हाण (२२, विजयपूर-कर्नाटक), अमिर खान (२०, कन्नौज-उत्तर प्रदेश), मोहम्मद हसीब (२०, फरुखाबाद-उत्तर प्रदेश) आणि मुजम्मिल आलम (२४, कन्नौज-उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.

हेही वाचा
सर्व पहा