मडगाव : गोव्यात वाघ आढळल्याचा दावा करत समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडिओ गोव्यातील नसून शेजारील कर्नाटक राज्यातील असल्याचा खुलासा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे.
या व्हायरल व्हिडिओची वन विभागाकडून अधिकृत पडताळणी करण्यात आली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक कमल दत्ता यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करून व्हिडिओचे सत्य स्पष्ट केले आहे, अशी माहिती मंत्री राणे यांनी कुडतरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
समाजमाध्यमांवर इतर राज्यांतील व्हिडिओ गोव्यातील असल्याचे भासवून प्रसारित केले जातात. काही वेळा एआयच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ वापरूनही संभ्रम निर्माण केला जातो. त्यामुळे अशा व्हिडिओंची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे राणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नागरिकांनी समाजमाध्यमांवरील अप्रमाणित माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणताही व्हिडिओ पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.


