अंडी, भाजीनंतर आता दुधाच्या दरात वाढ

मागील काही आठवडे पणजी बाजारात भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. अशातच अंडी, दुधाचे दर देखील वाढले आहेत. अंड्याचे दर १०० रुपये डझन झाले आहेत. तर अमूल नंतर आता वारणा दुधाचे दर देखील वाढले आहेत.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
अंडी, भाजीनंतर आता दुधाच्या दरात वाढ

पणजी : मागील काही आठवडे पणजी बाजारात भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. अशातच अंडी, दुधाचे दर देखील वाढले आहेत. अंड्याचे दर १०० रुपये डझन  झाले आहेत. तर अमूल नंतर आता वारणा दुधाचे दर देखील वाढले आहेत. वारणा फुल क्रीम दूध ४ रुपयांनी वाढून ७७ रुपये लिटर झाले आहे. तर टोन दुध ३० रुपयांवरून ३२ रुपये झाले आहे. गोकुळ दूधाचे दर ४ ते ६ रुपयांची वाढ झाली आहे. याआधी अमूलचे दुधाचे दर २ ते ४ रुपयांनी वाढले होते.

सोमवारी पणजी बाजारात भाज्यांचे दर  चढेच होते. बाजारात मोठा लिंबू १० रुपये नग या दरात विकला जात होता. मध्यम आकाराचा लिंबू ७ रुपये तर लहान लिंबू ५ रुपये नग होता. मिरचीचे दर वाढून १२० रुपये किलो झाले आहेत. कांदा ७० रुपये किलो आहे. लसूण आकारानुसार ४०० ते ५०० रुपये किलो झाला आहे. नारळाचे दर आकारानुसार २५ ते ६० रुपये नग आहे. पुढील काही दिवस दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

पणजी बाजारात वालपापडीचे दर दर्जानुसार १०० ते १२० रूपये किलो आहे. फ्लॉवर ५० रू. तर कोबी ४० रुपयांना आहे. ढब्बू मिरची १०० रुपये किलो दराने विकली जात होती. टोमॅटो ४० रुपये तर बटाटा ५० रुपये किलो आहे. बाजारात गवारी आणि भेंडी प्रत्येकी ८० रुपये किलो आहे. बाजारात लहान वांगी ६० तर मोठी वांगी ८० रुपये किलो आहेत. गाजर, कारले आणि बीट प्रत्येकी ८० रू. किलो आहेत. दुधी भोपळा ५० रुपयांना  नग आहे.

बाजारात दोडका ८० रुपये किलो आहे. शेवग्याच्या शेंगा ५० रुपयांला ६ नग होत्या. मेथी ३० रू. तर शेपू २५ रुपये जुडी आहेत. पालक, जुडी  २० रुपये आहेत. कोथिंबिरीचे दर कमी होऊन ३० रुपये जुडी झाले आहेत. फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर भेंडी ६८ रुपये, कोबी २४ रुपये, गाजर ४५ रुपये, वालपापडी ७९ रुपये, मिरची ६२ रुपये, कांदा ५६ रुपये, बटाटा ३१ रुपये तर टोमॅटो ३३ रुपये किलो आहेत.

हेही वाचा
सर्व पहा