दुसऱ्याला परके ठरवण्याची वृत्ती सर्वात मोठी क्रूरता : गिरीश कासारवल्ली

समाज काही विशिष्ट व्यक्तींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्या प्रक्रियेतून त्यांना कसे परके ठरवतो, यावर मी नेहमीच भाष्य करत असतो. माझे सर्व चित्रपट दुसऱ्याला परका मानण्याच्या प्रक्रियेबद्दल चर्चा करतात. एका व्यक्तीवर किंवा लोकांच्या समूहावर परकेपण लादणे ही सर्वांत मोठी क्रूरता आहे, असे प्रतिपादन दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी केले. शनिवारी इफ्फीमधील ‘इन कॉन्व्हरसेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. नमन रामचंद्रन यांनी त्यांच्याशी ‘समांतर चित्रपट’ विषयावर संवाद साधला.

Story: पिनाक कल्लोळी |
21st November, 11:15 pm
दुसऱ्याला परके ठरवण्याची वृत्ती सर्वात मोठी क्रूरता : गिरीश कासारवल्ली

गोवन वार्ता
पणजी
समाज काही विशिष्ट व्यक्तींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्या प्रक्रियेतून त्यांना कसे परके ठरवतो, यावर मी नेहमीच भाष्य करत असतो. ही परके ठरवण्याची प्रक्रिया मला खूप अस्वस्थ करते. माझे सर्व चित्रपट दुसऱ्याला परका मानण्याच्या प्रक्रियेबद्दल चर्चा करतात. एका व्यक्तीवर किंवा लोकांच्या समूहावर परकेपण लादणे ही सर्वांत मोठी क्रूरता आहे, असे प्रतिपादन दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी केले. शनिवारी इफ्फीमधील ‘इन कॉन्व्हरसेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नमन रामचंद्रन यांनी त्यांच्याशी ‘समांतर चित्रपट’ विषयावर संवाद साधला.
कासारवल्ली म्हणाले की, अनेक चित्रपटांत मुख्य पात्राला समाजातून बाहेर काढले जाते किंवा त्याला परके ठरवले जाते. समाज नकळतपणे काही लोकांना परके कसे ठरवतो, हे यात मांडले जाते. कोणाला तरी परके ठरवणे हा अत्यंत वेदनादायी अनुभव असतो. दुर्दैवाने संपूर्ण जगात ही परके ठरवण्याची प्रवृत्ती अस्तित्वाचा एक भाग बनली आहे. जे चित्रपट सामाजिकदृष्ट्या जागरूक असतात, ते राजकीयदृष्ट्याही प्रबळ असणे आवश्यक असते. अन्यथा, अशा विषयांवर भाष्य करणारे चित्रपट बनवणे शक्यच नाही. जेव्हा तुम्ही विशिष्ट मुद्द्यांवर बोलता, तेव्हा तुमची स्वतःची राजकीय भूमिका नक्कीच असते. राजकारण म्हणताना माझा अर्थ डावे विरुद्ध उजवे असा नाही. एखादी व्यक्ती लाकडाच्या ओंडक्यापासून वस्तू बनवत असेल, तर ती राजकीय कृती आहे असे म्हणता येईल. कारण त्या वस्तूची मूळ रचना बदलली जात आहे. तुम्ही समाजाची रचना बदलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही राजकीयदृष्ट्या जागरूक होता.
प्रत्येक निर्माता राजकीय व्यक्तिमत्त्वच असतो !
चित्रपट बनवणारा राजकीय विधानच करत असतो. ते विधान प्रस्थापित विचारसरणीच्या बाजूने असते किंवा तिच्या विरोधात. काही लोक म्हणतात की की, मी फक्त मनोरंजनासाठी चित्रपट बनवत आहे. माझ्या मते केवळ मनोरंजन अशी कोणतीही गोष्ट नसते. जेव्हा तुम्ही व्यवस्थेला आव्हान देता किंवा व्यवस्थेचे समर्थन करता, तेव्हा तुम्ही राजकीय भूमिका घेत असता. एकतर जैसे थे स्थिती टिकवून ठेवण्यासाठी किंवा बदलासाठी. प्रत्येक निर्माता राजकीय व्यक्तिमत्त्वच असतो, असे कासारवल्ली यांनी सांगितले .