चित्रपट लोकांचा दृष्टिकोन विस्तारू शकतात : इवा पुस्झिन्स्का

चित्रपट लोकांना आपल्या सभोवतालच्या जगाबाबत विचार करायला प्रवृत्त करू शकतात. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून आपण लोकांशी संवाद साधला पाहिजे. आपण लोकांचे दृष्टिकोन विस्तारले पाहिजेत, जेणेकरून त्यांना जीवनाचे आणि जगाचे इतर पैलू समजून घेता येतील असे प्रतिपादन फादरलँड चित्रपटाच्या निर्मात्या इवा पुस्झिन्स्का यांनी केले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
चित्रपट  लोकांचा दृष्टिकोन विस्तारू शकतात : इवा पुस्झिन्स्का

पणजी: चित्रपट कदाचित रातोरात जग बदलू शकणार नाहीत. परंतु ते लोकांचा दृष्टिकोन विस्तारू शकतात. तसेच संवादाला प्रोत्साहन देऊ शकतात. चित्रपट लोकांना आपल्या सभोवतालच्या जगाबाबत विचार करायला प्रवृत्त करू शकतात. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून आपण लोकांशी संवाद साधला पाहिजे. आपण लोकांचे दृष्टिकोन विस्तारले पाहिजेत, जेणेकरून त्यांना जीवनाचे आणि जगाचे इतर पैलू समजून घेता येतील असे प्रतिपादन फादरलँड चित्रपटाच्या निर्मात्या इवा पुस्झिन्स्का यांनी केले.

शनिवारी इफ्फीमध्ये (57th International Film Festival of India, Goa)  झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. इवा म्हणाल्या की, चित्रपट विविध दृष्टिकोनांविषयी समज निर्माण करून, संवादाला चालना देऊन लोकांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. कोणतीही एकच कथा किंवा विचारसरणी ही एकमेव वैध दृष्टिकोन असल्याचा दावा आपण करू शकत नाही. आजकाल लोक एकमेकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी, स्वतःच्याच दृष्टिकोनाशी घट्ट चिकटून राहत आहेत. आपण एकमेकांशी संवाद साधून समान दुवा शोधला पाहिजे. फादरलँड चित्रपटातील कथा १९४९ मधील विभाजित युरोपच्या पार्श्वभूमीवर घडते. तत्कालीन पूर्व-पश्चिम विभागणी आणि आजही समाजाला प्रभावित करणाऱ्या विभाजनांवर प्रकाश टाकते.

त्या म्हणाल्या, हा चित्रपट विशेषतः स्थलांतराच्या काळात. आपली ओळख आणि आपलेपणाच्या भावनेबद्दलही प्रश्न उपस्थित करतो. तुमची मातृभूमी (फादर लँड) नेमकी कोणती? तुम्ही ज्या देशात राहता तो, की तुम्ही बोलता ती भाषा? तुमचा इतिहास ज्या भूमीशी जोडलेला आहे ती, की जिथे तुम्ही सध्या वास्तव्यास आहात? हा चित्रपट व्यक्ती आणि तिची मातृभूमी यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांचा शोध घेतो.

व्यापक स्तरावर, ऐतिहासिक घडामोडी कशा प्रकारे व्यक्तींच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात, याचे चित्रण यात करण्यात आले आहे. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती लोकांसमोर आदर्श निर्माण करू शकतात आणि त्यांना प्रेरणा देऊ शकतात.

इवा यांनी भारत आणि पोलंड यांच्या सामायिक इतिहासावर आधारित चित्रपट बनवण्याबाबतही रस दर्शवला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात आश्रय घेतलेल्या पोलिश मुलांच्या कथेवर त्यांनी भाष्य केले. इफ्फी महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, गोवारीकर यांनी या विषयावर आधीच एक पटकथा लिहिली आहे. या विषयावर चर्चा पुढे सुरू राहील. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या शक्यतेवर विचार केला जाऊ शकेल अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा