वास्को येथे दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोन व्यक्तींचे अज्ञातांनी अपहरण केल्याच्या तक्रारी वेर्णा व दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकांत नोंद झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ उत्तर प्रदेश परंतु कामानिमित्त वेर्णा येथे राहणारा आकाश मनू कुमार सिंग याने आपल्या शेजाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार केली आहे. १३ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता त्याचा शेजारी सुजीत कुमार जैस्वाल याचा फोन आला होता. त्याला पैसे मिळाल्याने तो उत्तरप्रदेशातील आपल्या गावी निघण्यासाठी मडगाव रेल्वे स्थानकावर पोहचला होता. परंतु रात्री अकराच्या दरम्यान सुजीत कुमार याला आकाश याने वारंवार फोन केला असता, त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. त्यामुळे सुजीत कुमार याचे अपहरण झाल्याचा संशय आकाश याने व्यक्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मंदार गावकर पुढील तपास करत आहेत.
मुंबई येथील रहिवाशी प्लश हरन यांनी आपल्या भावाचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दाबोळी विमानतळावर नोंदविली आहे. १७ नोव्हेंबरला रात्री दहा वाजता दाबोळी विमानतळावरून एका अज्ञात व्यक्तीने दिक्षित हरन (२९) याचे अपहरण केल्याचा संशय प्लश हरन याने व्यक्त केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता मोरजकर पुढील तपास करत आहेत.