थिवीतील व्यावसायिकाला सायबर भामट्यांनी घातला १.१४ लाखांना गंडा

ऑनलाईन कर्जाच्या आमिषाने केली फसवणूक; इंदिरानगर, थिवी व मूळ कर्नाटकातील एका व्यावसायिकाला ऑनलाईन वैयक्तिक कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून दोघा अज्ञात सायबर भामट्यांनी १.१४ लाख रूपयांना गंडा घातला आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
थिवीतील व्यावसायिकाला सायबर भामट्यांनी घातला १.१४ लाखांना गंडा

म्हापसा : इंदिरानगर, थिवी व मूळ कर्नाटकातील एका व्यावसायिकाला ऑनलाईन वैयक्तिक कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून दोघा अज्ञात सायबर भामट्यांनी १.१४ लाख रूपयांना गंडा घातला आहे. हा फसवणुकीचा प्रकार २ नोव्हेंबर रोजी घडला. कोलवाळ पोलिसांनी (Colvale Police Station)  याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी राहुल राठोड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी राठोड हे इन्स्टाग्रामवरील पोस्ट चाळत होते. त्यावेळी तिथे एक ऑनलाईन वैयक्तिक कर्जाची जाहीरात दिसली. ही जाहीरात ‘धनी लोन्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड’ या नावाने होती.

फिर्यादींना आपल्या कामगारांना पगार घालायचा होता. यासाठी मोठी रक्कम हवी होती. त्यामुळे सदर जाहीरातीवर असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता संशयित आरोपी हरीश पी.व्ही. नामक व्यक्तीने आपण ‘धनी लोन्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड’चा व्यवस्थापक असल्याचे भासवले तसेच पप्पू एंटरप्रायझेसच्या सर्वेश पवार उर्फ पप्पू यानेही तक्रारदाराशी संपर्क साधला.

या संशयित आरोपींनी व्हॉट्सअॅपद्वारे तक्रारदाराशी संपर्क साधला. आणि त्यांना ऑनलाईन वैयक्तिक कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. त्याबदल्यात कर्ज आणि बँक चार्जेसच्या नावाखाली फिर्यादीला पैसे भरण्यास भाग पाडले. या प्रक्रियेदरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक मधील फिर्यादींच्या बँक खात्यातून विविध यूपीआय व्यवहारांद्वारे १ लाख १४ हजार ९३९ रुपये एवढी रक्कम फसवणूक आणि अप्रामाणिकपणे काढून घेतली.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यावर राठोड यांनी सायबर पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली. नंतर ही तक्रार वर्ग झाल्यावर कोलवाळ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३१९ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी वरील दोन्ही बँकांना यूपीआय मार्फत व्यवहार झालेल्या बँक खात्यांचा तपशील सादर करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर रक्कम हस्तांतरण झालेल्या संशयित आरोपींची नावे पोलिसांच्या हाती लागणार आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र साटेलकर हे करत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा