डिचोली : धावसकरवाडा-कारापूर येथील दोन गटांत झालेल्या हाणामारी व प्राणघातक हल्ला प्रकरणी डिचोली पोलिसांनी सर्वेश धावसकर या संशयिताला शुक्रवारी सायंकाळी अटक केली. सामाजिक कार्यकर्ते गौरीश घाडी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत विविध पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात ठाण मांडले होते.
धावसकरवाडा-कारापूर आणि कारापूर गावातील युवकांमधील वादातून धमकी दिल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांमध्ये जोरदार वादावादी होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत कारापूरमधील सहा, तर धावसकरवाड्यावरील एक जण जखमी झाला. कारापूर येथील लोढा महाप्रकल्पविरोधातील आंदोलनाचे पुढारी गौरीश घाडी यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला, तर इतरांना लोखंडी सळ्या व दंडुक्यांनी मारहाण झाली. धावसकरवाड्यावरील रामा धावसकर यांच्या डोक्यालाही जबर मार बसला. पोलिसांनी दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे नोंदवले आहेत.
घटनेची माहिती मिळताच गुरुवारी रात्री लोढा प्रकल्पविरोधी धरणे आंदोलनातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी डिचोली पोलीस स्थानकात गर्दी केली. हल्लेखोराला अटक करण्याची मागणी करत आंदोलकांनी स्थानकाच्या मुख्य गृहात व पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये ठिय्या मांडला. यावेळी पोलीस उपअधीक्षक गौरव यादव यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
रात्री आमदार वीरेश बोरकर, आपचे वाल्मिकी नायक, अॅड. अजय प्रभुगावकर, गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत व डिचोली गट काँग्रेसचे नेते उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या आवाहनानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार विरियातो फर्नांडिस, महेश म्हांबरे, नगरसेवक प्रवीण ब्लेगन, खेंबलो सावंत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.
राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असून जमिनी बाहेरच्यांना दिल्याने गोमंतकीयांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री या नात्याने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आमदार वीरेश बोरकर यांनी केली.
गोवेकरांना मारणाऱ्यांना सरकार सुरक्षा देत असून रक्षण करणाऱ्यांना पोलीस राजकारण्यांच्या इशाऱ्यावरून छळत आहेत, अशी टीका खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केली.


