म्हापसा : नेरुल येथे पोलीस असल्याचे भासवून एका युवकाला धमकावून त्याची लुबाडणूक करणारा सराईत गुन्हेगार संशयित आगुस्तिनो सांतान कार्व्हालो (४३, रा. माजोर्डा, सासष्टी) याला साळगाव पोलिसांनी अटक केली. आगुस्तिनो याच्याविरुद्ध कोलवा पोलिसांत चोरी व लुबाडणूकीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.
याप्रकरणी पोलिसांत अजय कुमार साहनी (रा. मायणा-पिळर्ण व मूळ बिहार) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास फट्टावाडो, नेरूल येथे घडली होती.
फिर्यादी हे घटनास्थळावरून जात असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्याला अडवले. स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्याच्याकडील १० हजार रुपये रक्कम बळजबरीने लुबाडून नेली.
पोलिसांनी ओळख पटल्यानंतर आगुस्तिनो कार्व्हालो याला अटक केली. पोलिसांनी संशयित आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्कूटर मोबाईल फोन जप्त केला.
संशयित आरोपीला म्हापसा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या नेतृत्वानाखाली उपनिरीक्षक मनेश दाभाळे, हवालदार विशांत मयेकर, कॉन्स्टेबल तुळशीदास गावस, राहुल अंगोलकर व योगेश तेली या पथकाने ही कामगिरी केली.


