यंदाचा इफ्फी स्मरणीय करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक : आशुतोष गोवारीकर

यावर्षी इफ्फी मध्ये आम्ही अनेक नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या वर्षीही हे प्रयत्न सुरू ठेवण्याची आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
यंदाचा इफ्फी स्मरणीय करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक : आशुतोष गोवारीकर

पणजी :  यावर्षी इफ्फी  (57th International Film Festival of India in Goa) मध्ये आम्ही अनेक नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या वर्षीही हे प्रयत्न सुरू ठेवण्याची आमची इच्छा आहे.  यासाठी सर्वांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे.

यंदा इफ्फीच्या विविध विभागात स्टोरीज विथआऊट बॉर्डर ( सीमा नसलेल्या कथा) या थिमवर आधारित चित्रपट निवडण्यात आले आहेत. चित्रपट रसिकांनी अधिकाधिक चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी केले.

शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोवारीकर यांनी सांगितले की, महोत्सव कालावधीत मी पूर्णवेळ गोव्यातच असणार आहे. यादरम्यान विविध चित्रपट रसिक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पाहुणे, माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्यात येईल. यामध्ये महोत्सवातील विविध चित्रपट, गाला इव्हेंट्स किंवा रेट्रोस्पेक्टिव्ह विभाग यांसारख्या प्रत्येक विभागावर चर्चा करण्याचा आमचा हेतू आहे.

माझ्यासाठी इफ्फीतील सर्व विभाग महत्त्वाचे आहेत. मग तो रेट्रोस्पेक्टिव्ह असो, २५ वर्षांचा आढावा असो, किंवा आपण दाखवत असलेले शताब्दी वर्षाचे (सेंटेनरी) चित्रपट असोत. सध्या जगभरात ज्या प्रकारचा संघर्ष सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर यंदाची थीम निवडली आहे.

जसे विविध राष्ट्रांमध्ये संघर्ष आहेत, तसेच आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातही काही अंतर्गत समस्या आहेत. त्यामुळे, 'सीमा नसलेल्या कथा' म्हणजे केवळ भौगोलिक सीमांच्या कथा नव्हेत. यात कुटुंबातील सीमा, दोन भावांच्या मधील दुरावा, जाती-धर्माच्या भिंती, किंवा सामाजिक-सांस्कृतिक स्तरावर आपल्याला जाणवणारे विविध अडथळे - अशा सर्व प्रकारच्या सीमांचा समावेश होतो. केवळ देशात नव्हे, तर जगभरात अशा सीमा अस्तित्वात आहेत. या संकल्पनेला अनुसरून आम्ही चित्रपटांची निवड  केली आहे. असे असले तरी सर्वच चित्रपट या चौकटीत बसतीलच असे नाही.

आम्ही यंदा तीन नवीन विभाग सुरू केले आहेत. यामध्ये ॲनिमेशन, डॉक्यु-ड्रामा आणि चित्रपटांवर आधारित चित्रपट (फिल्म्स अबाउट फिल्म्स) यांचा समावेश आहे. आमच्याकडे मिफ सारखा महत्त्वाचा महोत्सव आहे जो पूर्णपणे डॉक्युमेंटरी आणि लघुपटांवर केंद्रीत आहे. तरीही, आम्ही इफ्फीमध्ये डॉक्युमेंटरीजचा समावेश केला आहे. कारण आजच्या काळात डॉक्युमेंटरीजची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. आम्हाला डॉक्युमेंटरी निर्मात्यांना वर्षातून दोन महोत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी द्यायची आहे.

गोवारीकर म्हणाले की, महोत्सवातील चित्रपटांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहावे. अन्य महोत्सवात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना आम्ही प्रीमियम विभागात शक्यतो स्थान देत नाही. यंदाच्या इफ्फीमध्ये कोणता चित्रपट निवडला गेला नाही, यावर दुःख करत बसण्यापेक्षा, जे उत्कृष्ट चित्रपट निवडले गेले आहेत, त्यांचा आनंद साजरा करा.

हेही वाचा
सर्व पहा