म्हादई; परवान्यांसाठी कर्नाटकचे केंद्राला साकडे

लवादाच्या आदेशाची कार्यवाही करण्याची मागणी; म्हादईचा वाद न्यायप्रविष्ट असला तरी म्हादई लवादाने कर्नाटकला पाण्याचा जो वाटा दिलेला आहे, तो मिळायलाच हवा. यासाठी आवश्यक ते परवाने केंद्राने कर्नाटकला द्यावे, अशी मागणी कर्नाटकने केंद्राकडे केली आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
19th November, 05:37 pm
म्हादई; परवान्यांसाठी कर्नाटकचे केंद्राला साकडे

पणजी : म्हादईचा वाद न्यायप्रविष्ट असला तरी म्हादई लवादाने कर्नाटकला पाण्याचा जो वाटा दिलेला आहे, तो मिळायलाच हवा. यासाठी आवश्यक ते परवाने केंद्राने कर्नाटकला द्यावे, अशी मागणी कर्नाटकने केंद्राकडे केली आहे. (Mahadayi karnataka appeals to center for permissions). प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी फॉरेस्ट क्लीअरन्स तसेच इतर परवाने देण्यात कसलीही अडचण नाही, असे कर्नाटकचे वकील मोहन कतर्की यांनी म्हटले आहे.

कर्नाटकच्या प्रस्तावित 'म्हादई नदी पाणी वळवण्याच्या प्रकल्पा'ला  केंद्र सरकारने बेळगावी येथील ७१ एकर वनजमिनीसाठी आवश्यक असलेली वन-मंजुरी (फॉरेस्ट क्लिअरन्स) मिळवण्याबाबतचा कर्नाटकचा प्रस्ताव मंजुरीच्या यादीतून काढून टाकला होता. यानंतर कर्नाटकने ही मागणी केली आहे.

गोव्याची बाजू अधिक भक्कम होईल : मंत्री शिरोडकर

केंद्रीय वन मंत्रालयाने मागितलेले स्पष्टीकरण सादर करण्यात कर्नाटक अपयशी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळेही वन-मंजुरीची प्रक्रिया रखडली आहे. हा निर्णय गोव्याच्या बाजूने असून, यामुळे न्यायालयात गोव्याची बाजू अधिक भक्कम होईल, असे गोव्याचे जलसंसाधन मंत्री सुभाष शिरोडकर यांनी म्हटले आहे. 

म्हादई नदीचे पाणी वळवण्याचा मुद्दा गोवा आणि कर्नाटक यांच्यातील वादाचा मुख्य विषय राहिला आहे. कर्नाटकच्या या पाणी वळवण्याच्या योजनांना गोव्याचा तीव्र विरोध आहे. तरीही हा प्रकल्प पुढे रेटण्याचे कर्नाटकचे प्रयत्न सुरूच आहेत.

हेही वाचा
सर्व पहा