वास्को : मुरगाव मतदारसंघात १३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव पांढरा हत्ती बनल्याचा (13 crore swimming pool in Mormugao becomes white elephant ) आरोप गोवा फॉरवर्डचे नेते तथा माजी नगरसेवक निलेश नावेलकर यांनी केला आहे.
या जलतरण तलावात आतापर्यंत १३ जणांनीही प्रशिक्षण घेतलेले नाही. एवढा मोठा खर्च करून उभारलेली सुविधा प्रत्यक्षात जनतेच्या किती उपयोगी पडली, असा प्रश्न नावेलकर यांनी उपस्थित केला. तलावाच्या परिसरात असलेल्या निवासी वसाहतींमुळे महिलांना असुरक्षित वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तलावाची योग्य देखभाल होत नसून, पाण्यात कावळे आणि कबुतरे पोहत असतात. त्यांच्या विष्ठेमुळे पाणी दूषित झाले आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असले, तरी अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून हा तलाव नागरिकांच्या वापरासाठी बंद असल्याचे नावेलकर यांनी सांगितले.
१३ कोटी रुपये खर्च करून उभारलेली सुविधा नागरिकांच्या उपयोगाऐवजी बंद अवस्थेत पडून असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी, असा सवाल करत नावेलकर यांनी भाजपच्या विकासकामांवर टीका केली. जनतेच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पांचा योग्य वापर, देखभाल आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचेही निलेश नावेलकर म्हणाले.


