मडगाव : न्यायालयीन अधिकारी, बँक अधिकारी आणि सरकारी यंत्रणांमध्ये प्रभावशाली ओळख असल्याचे भासवून विविध कामे करून देण्याच्या बहाण्याने मायलेकींची २३ लाख ४१ हजार २८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी (Fatorda Police) संशयित महिलेला अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांत अटक केली. रेक्सी रेखा डॅनियल अमोलिक (रा. आके, मडगाव) असे संशयित महिलेचे नाव आहे.
बोर्डा- मडगाव येथील रीमा अरुण बांदोडकर यांनी मंगळवारी दुपारी ३.४० वाजता याप्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संशयित रेक्सी रेखा अमोलिक हिने तक्रारदार रीमा बांदोडकर आणि त्यांच्या आई अनुराधा बांदोडकर यांचा विश्वास संपादन केला.
न्यायालयीन अधिकारी, बँक अधिकारी तसेच सरकारी यंत्रणांमध्ये आपले प्रभावशाली संबंध असल्याचा दावा करून घटस्फोटाचे प्रकरण, मालमत्तेसंबंधी वाद आणि बँक कर्जाच्या समस्या सोडवून देण्याचे आश्वासन तिने दिले होते. यासाठी 'सेंट मदर तेरेसा फाउंडेशन'च्या माध्यमातून मदत करण्याचेही तिने सांगितले होते.
या आश्वासनांवर विश्वास ठेवून तक्रारदाराने आईच्या उपस्थितीत संशयित महिलेला वेळोवेळी पैसे दिले. त्यात १८ लाख ३५ हजार रुपये रोख, तर ५ लाख ६ हजार २८० रुपये यूपीआयद्वारे देण्यात आले. अशा प्रकारे एकूण २३ लाख ४१ हजार २८० रुपये घेतल्यानंतरही संशयितेने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. तसेच संबंधित कामांसाठी इतरांना पैसे दिल्याचे कोणतेही कागदोपत्री पुरावेही सादर केले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बांदोडकर यांनी पोलिसांत धाव घेतली.
या तक्रारीच्या आधारे फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत बुधवारी दुपारी ३.३० वाजता संशयित रेक्सी रेखा अमोलिक हिला अटक केली. गुन्हा नोंदवल्यानंतर २४ तासांच्या आत ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, संशयित महिलेविरुद्ध मायणा-कुडतरी आणि कुडचडे पोलीस स्थानकांतही अशाच स्वरूपाच्या तक्रारी दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दक्षिण गोव्याचे पोलीस (South Goa Police) अधीक्षक अक्षत आयुष (आयपीएस), मडगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीदेवी बी. व्ही. (आयपीएस) आणि फातोर्डा पोलीस निरीक्षक राहुल एस. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


