कोलवाळ तुरुंगात विकट भगतवर कैद्यांकडून प्राणघातक हल्ला

टारझन पार्सेकर, सागर पाटीलसह इतरांविरोधात गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
18th November, 11:17 pm
कोलवाळ तुरुंगात विकट भगतवर कैद्यांकडून प्राणघातक हल्ला

पणजी : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी विकट भगत याच्यावर दहा जणांहून अधिक कैद्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात भगत याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी कैदी टारझन पार्सेकर, सागर पाटील यांच्यासह इतर कैद्यांविरोधात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कारागृह प्रशासनाचे तुरुंग उपअधीक्षक अनिल गावकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला विकट भगत कारागृहातील खुल्या जागेत होता. त्याचवेळी न्यायालयीन कामकाजासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला गेलेले कैदी टारझन पार्सेकर, सागर पाटील आणि इतर कैदी आपल्या बॅरेकमध्ये परतत होते.
यावेळी खुल्या जागेत विकट भगत दिसताच संबंधित कैद्यांनी पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला केला. दहा जणांहून अधिक कैद्यांनी त्याला घेरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत भगत याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कारागृह प्रशासनाने दाखल केलेल्या तक्रारीत या घटनेचा तपशील नमूद करण्यात आला आहे.
तुरुंग कर्मचाऱ्यांकडून सुटका
हल्ला सुरू असताना कारागृहातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून विकट भगत याची हल्लेखोर कैद्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्याला तातडीने म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारांसाठी त्याला बांबोळी येथील गोमेकॉत हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.‍‍‍‍
तुरुंग प्रशासनाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, कारागृहात कैद्यांमधील गटबाजी आणि पूर्ववैमनस्यातून होणाऱ्या मारहाणीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. याशिवाय कारागृहात अमली पदार्थ आणि मोबाईल फोनची तस्करी होत असल्याचे प्रकारही यापूर्वी उघडकीस आले आहेत. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था आणि कैद्यांवरील नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मॅकाग्लिन खून प्रकरणात जन्मठेप
विकट भगत हा २०१७ मध्ये काणकोण तालुक्यातील राजबाग येथे ब्रिटिश-आयरिश दुहेरी नागरिकत्व असलेल्या डॅनियल मॅकाग्लिन या युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणातील दोषी आहे. या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने २०२५ मध्ये भगत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार तो कोलवाळ कारागृहात शिक्षा भोगत आहे.
कोलवाळ कारागृहात मारहाणीचे सत्र सुरूच

कोलवाळ कारागृहात कैद्यांमधील पूर्ववैमनस्यातून मारहाणीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. काही काळापूर्वी कैदी देवराज ह्यो याला सहकारी कैद्यांनी मारहाण केली होती. तसेच राकेश पाटील या कैद्याला नारायण ऊर्फ बाबू भालेकर याने मारहाण केल्याची घटनाही घडली होती.      

हेही वाचा
सर्व पहा