वीकेंडचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येत्या शुक्रवारी नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, झी५ आणि सोनी लिव्ह यांसारख्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेक नवे चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. यामध्ये भुवन बामच्या बहुप्रतीक्षित ‘ढिंढोरा २’ या विनोदी सिरीजपासून ते अशोक सेल्वन आणि प्रीती मुकुंदन यांच्या ‘अन्बिल अवन’ या रोमँटिक सर्व्हायव्हल ड्रामाचा समावेश आहे.

हायकू । नेटफ्लिक्स
हा एक तमिळ रोमँटिक चित्रपट असून यामध्ये एगन मुख्य भूमिकेत आहे. मनोहर नावाच्या तरुणाच्या अतिपझेसिव्ह स्वभावामुळे कॉलेजमधील त्याचे पहिले प्रेम संपुष्टात येते. काही वर्षांनंतर जेव्हा त्याला प्रेमाची दुसरी संधी मिळते, तेव्हा जुन्या चुका सुधारून, असुरक्षिततेची भावना सोडून भावनिकदृष्ट्या परिपक्व होण्याचा त्याचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळेल.

पर्सी जॅक्सन अँड द ऑलिम्पियन्स सीझन ३ । जिओहॉटस्टार
रिक रिओर्डन यांच्या ‘द टायटन्स कर्स’ या कादंबरीवर आधारित या तिसऱ्या पर्वात पर्सी जॅक्सन (वॉकर स्कोबेल) एका धोकादायक मोहिमेवर निघतो. अॅनाबेथ चेस (लीह सावा जेफ्रीज) हिची सुटका करणे आणि देवी आर्टेमिसला कैदेतून मुक्त करणे हे त्याचे मुख्य ध्येय असते. क्रोनोसने ऑलिम्पस उलथवून टाकण्याची धमकी दिल्याने, संभाव्य महासंकट टाळण्यासाठी पर्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांची वेळेविरुद्ध शर्यत सुरू होते.

ढिंढोरा २ । नेटफ्लिक्स
प्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम पुन्हा एकदा ‘टिटू मामा’च्या भूमिकेत परतत आहे. यावेळी आपले कर्ज फेडण्यासाठी आणि सासरच्या मंडळींशी बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी तो सज्ज झाला आहे. मात्र, बबलूजी, जानकी, समीर आणि बांचो यांच्यासोबत एका खजिन्याच्या शोधात अडकल्याने त्याच्या सर्व योजनांवर पाणी फिरते. कविता मामीच्या (संजीदा शेख) गावातील कडक परंपरा सांभाळताना त्यांची ही मोहीम एका धमाल गोंधळात रूपांतरित होते.

तीन तिगाडा । झी५
उदयोन्मुख क्रिकेटपटू अस्मानी (प्रसन्ना बिष्ट) आणि संगीतकार मानस (दानेश रझवी) या तरुण जोडप्याचे आयुष्य अनपेक्षित गर्भधारणेमुळे पूर्णपणे बदलून जाते. करिअरमध्ये उत्तम संधी चालून येत असतानाच, पालकत्वाची जबाबदारी, कुटुंबाच्या वाढत्या अपेक्षा आणि कठीण निर्णयांना या दोघांना सामोरे जावे लागते.

स्टेप्स । नेटफ्लिक्स
सिंड्रेलाच्या परीकथेला एक वेगळे आणि मजेशीर वळण देणारा हा अॅनिमेटेड फँटसी कॉमेडी चित्रपट आहे. सिंड्रेलाची सावत्र बहीण लिलिथ (अॅली वोंग) हिच्याकडून फेयरी गॉडमदरची (बेट मिडलर) जादूची कांडी चुकून चोरीला जाते आणि संपूर्ण राज्यात एकच गोंधळ उडतो, याची रंजक कथा यात मांडण्यात आली आहे.

अन्बिल अवन । सोनी लिव्ह
कॉर्पोरेट जगातील धावपळीला कंटाळून सूर्या (अशोक सेल्वन) आणि इयल (प्रीती मुकुंदन) हे विवाहित जोडपे एका शांत हिल स्टेशनवर स्वतःचे व्हिंटेज होमस्टे सुरू करण्यासाठी जातात. परंतु, एका स्थानिक प्रभावशाली व्यक्तीच्या धमक्यांमुळे आणि त्यांना तेथून हाकलून लावण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांचे शांत आयुष्य जगण्याचे स्वप्न भंग पावते. नवीन सुरुवातीचा हा प्रवास पुढे अस्तित्वाच्या लढाईत बदलतो.

परफेक्ट लायर्स । अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ
हा एक स्पॅनिश मिस्ट्री थ्रिलर आहे. आपल्या भावाच्या अकाली मृत्यूमागील गूढ उकलण्यासाठी ज्यूड डेरी (आयरीन बाल्मेस) प्रतिष्ठित टॅगस विद्यापीठात प्रवेश घेते. श्रीमंत कॅश बंधूंच्या जवळ जाण्याच्या तिच्या गुप्त मोहिमेला पुढे सूड, फसवणूक आणि विश्वासघाताच्या एका धोकादायक खेळाचे स्वरूप येते.

प्राईमटाईम प्रीचर्स । नेटफ्लिक्स
१९८० च्या दशकातील अमेरिकेतील ‘टेलिव्हँजेलिझम’चा (टीव्हीवरील धर्मप्रसार) उदय आणि त्याचा राजकीय प्रभाव उलगडणारी ही डॉक्युमेंटरी आहे. जिम बेकर, जेरी फॉलवेल आणि जिमी स्वॅगार्ट या तीन प्रमुख धर्मोपदेशकांमधील तीव्र स्पर्धा आणि टीव्हीवरील धर्माच्या व्यवसायाची काळी बाजू यातून समोर आणली आहे.

ऑन बिहाफ ऑफ माय सन । नेटफ्लिक्स
एका भीषण बस अपघाताला आपला मुलगा कारणीभूत ठरल्यानंतर, विसेंटिना (रेजेन फारिया) नावाची महिला स्वतःचे दुःख बाजूला सारून अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा आणि त्यांची माफी मागण्याचा निर्णय घेते. तिच्या या भावनिक प्रवासाची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात पाहायला मिळेल.


